Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Sangli › मगर आली पळा, पळा... बाहेर पडा!

मगर आली पळा, पळा... बाहेर पडा!

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 07 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

सकाळी साडेआठ नऊची वेळ. कृष्णा नदीत अनेकांची पोहायला झालेली गर्दी. वसंतदादांच्या समाधीजवळ अचानक मगर आली आणि  पळा..पळा... बाहेर पडा याचा गलका उठला. पोहणार्‍यांच्या आरोळ्यांनी परिसरात क्षणात भीती पसरली. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांच्यासह काहींनी पोहणार्‍यांच्या घोळक्यात घुसलेल्या मगरीचा नावेतून पाठलाग करून तिला  हुसकावून लावले. त्यांच्या सतर्कतेने अनेक महिला, मुलींसह मुलांचा जीव वाचला.

उकाड्यात वाढ झाल्याने गेल्या चार दिवसांपासून येथील कृष्णा नदीत सकाळी पोहायला येणार्‍यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. सरकारी घाट, माई घाट ( स्वामी समर्थ घाट) या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने आज काहीजण वसंतदादांच्या समाधीजवळ असणार्‍या घाटाकडे पोहायला गेले होते. 

सकाळी साडेआठच्या सुमारास वसंतदादांच्या समाधीजवळ असणार्‍या घाटाजवळ अनेक महिला, युवती, मुले पोहत होते. त्याचवेळी अचानक पंधरा ते सोळा  फूट मगर पोहणार्‍यांच्या घोळक्यात घुसली. काहींनी मगरीला पाहताच आरडा-ओरडा सुरू केला. पोहण्यात दंग असणार्‍यांना सुरूवातीला काहीच  समजले नाही. 

मात्र घोळक्यात मगर घुसल्याचे समजल्यानंतर जो-तो काठाकडे धावत सुटला. या पळापळीत अनेकजण घाटावर घसरून पडले. मगरीच्या दर्शनाने उपस्थितांनी प्रचंड आरडा-ओरडा केला. मात्र मगर तेथेच होती. मगर आल्याचे समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, मोहन पेंडसे, भीमगोंडा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखून नावेतून मगरीचा पाठलाग सुरू केला. आयर्विन पुलापासून खाली जाईपर्यंत त्यांनी पाठलाग सुरूच ठेवला. 

या घटनेमुळे घाबरलेल्यांनी काठावर बसूनच अंघोळ करण्यास प्राधान्य दिले. यापूर्वीही अनेकवेळा आयर्विन पूल परिसरात मगरीने दर्शन दिले आहे. कसबेडिग्रज, मौजे डिग्रज येथे मगरीने हल्ले केले आहेत. या परिसरात मगरीचा वावर असल्याबाबत वनविभाग आणि महापालिका प्रशासनाला सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तातडीने या मगरींचा बंदोबस्त न केल्यास सांगलीत दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 

Tags : sangli, sangli news, Krishna river, Crocodiles,