Mon, May 25, 2020 19:07होमपेज › Sangli › वाळव्याची जनताच जयंतरावांचे गर्वहरण करेल

वाळव्याची जनताच जयंतरावांचे गर्वहरण करेल

Published On: Dec 01 2017 9:10AM | Last Updated: Nov 30 2017 11:53PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ आहे. जनतेने भल्याभल्यांना पराभूत केलेले आहे. रावणाचे चौदा चौकड्यांचे राज्य टिकले नाही; तिथे ‘यांचे’ काय? जयंत पाटील यांचे गर्वहरण वाळव्याची जनताच करेल. निवडणुकीत जनता इतिहास घडवेल, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच वाळवा येथे कार्यक्रम झाला.  मुख्यमंत्र्यांच्या टीकेकडे जयंतरावांचे लक्ष वेधल्यानंतर ‘मला रोखण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. मला आव्हान देणारे संपले, माझा नाद करू नका’, असे आव्हान आमदार जयंत पाटील यांनी दिले होते. 

त्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री खोत म्हणाले, जनतेने भल्याभल्यांची सत्ता उलथून टाकली आहे. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ आहे. जनतेपेक्षा कोणी मोठा नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत वाळव्यातील जनतेने कौल दिलेला आहे.  

वाळव्यात तिघांवर गुन्हा दाखल

खोत म्हणाले, माहितीचा अधिकार सुरू करण्यामागे उदात्त हेतू आहे.  मात्र काहींनी या अधिकाराचा वापर व्यवसाय म्हणून सुरू केला आहे. सर्व विभागांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवून अधिकार्‍यांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. इस्लामपूर येथे माहितीच्या अधिकारात माहिती मागवून त्रास देणार्‍या तिघांवर वीस जणांनी गुन्हे दाखल केले आहेत. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. 

एफआयआर दाखल करण्याचे आदेश

जिल्हापरिषदेत गुरूवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समिती सभा झाली. या सभेतही राज्यमंत्री खोत यांनी माहिती अधिकारात माहिती मागवून त्रास देणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले. अधिकार्‍यांनी संबंधितांवर ‘एफआयआर’ दाखल करावेत, असे आदेश खोत यांनी दिले. एकच व्यक्ती अनेक विभागांकडे माहिती मागते. अधिकार्‍यांना त्रास देते हा प्रकार गंभीर आहे. कृषी विभागाची माहिती मागण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.  

इरिगेशन योजनांसाठी ठिबक

इरिगेशन योजनांकडील पिकाखालील क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासंदर्भात आराखडा तयार करा, अशी सुचना ना.खोत यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साबळे यांना दिली. ठिबक अनुदानासाठी पूर्वमंजुरी दिलेल्या सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना शासन अनुदान मिळालेले आहे. अर्ज केलेल्या उर्वरित आठ हजार शेतकर्‍यांनाही ठिबक अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे खोत यांनी सांगितले.