Mon, Jun 17, 2019 02:24होमपेज › Sangli › जि.प. सीईओंसह सहाजणांवर फौजदारी

जि.प. सीईओंसह सहाजणांवर फौजदारी

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 7:37PMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासह सहा अधिकार्‍यांनी गोपनीय माहिती जाहीर करून नियमबाह्य कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू झाली आहे,  अशी  माहिती  अण्णासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाटील म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, तत्कालीन उपकार्यकारी अधिकारी रमेश जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर, लेखाधिकारी सरताजअली शेख, आस्थापनाप्रमुख रोहन शेटे, तत्कालीन आस्थापना सुपरवायझर विजय डांगे यांच्याविरोधात सांगलीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. दि. 13 डिसेंबर 2017 रोजी राऊत यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी संगनमत करून प्रसार माध्यमांना खोटी माहिती पुरवली, अशी माझी फिर्याद आहे. 

ते म्हणाले, मी जिल्हा परिषदेत अनेक वर्षे निष्ठेने सेवा केली. कर्मचारी संघटनेचे अनेक वर्षे नेतृत्व केले. परंतु जिल्हा परिषदेतील सर्वांनीच संगनमताने माझी बदनामी केल्याप्रकरणी मी न्यायालयात दाद मागितली आहे.  प्रत्येकाने एक कोटी रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. जि. प. प्रशासनाने दिलेल्या नोटिसीला सविस्तर उत्तर दिले आहे. प्रशासनाने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मुद्रणालय व्यवस्थापक म्हणून काम करताना गोपनीयतेस प्राधान्य देऊन कामकाज चोख ठेवले होते. मुद्रणालयाच्या रकमा शासन निर्णयानुसार जिल्हा  बँकेत ठेव स्वरूपात ठेवल्या आहेत. त्यावर लाखो रुपये व्याज मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने माझ्यावर कारवाई करणे अयोग्य आणि अन्यायकारक असल्याचेही ते म्हणाले.

गोपनियता भंग केलेला नाही : सीईओ राऊत

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले, प्रशासनाने या प्रकरणात कुठलीही नियमबाह्य, गोपनियता भंग करणारी किंवा बदनामीकारक कृती केलेली नाही. आवश्यक त्या ठिकाणी प्रशासन आपली बाजू सक्षमपणे मांडेल.