Fri, May 24, 2019 20:56होमपेज › Sangli › माधवनगरमध्ये गुन्हेगाराच्या नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला

माधवनगरमध्ये गुन्हेगाराच्या नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 11:10PMसांगली : प्रतिनिधी

तुपारी (ता. वाळवा) येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शुक्रराज घाडगे याला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांवर पाच जणांनी हल्ला केला. घाडगेला अटक करू नये म्हणून हल्लेखोरांनी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांचा कडाडून चावा घेतला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक विशाल विलास पाटील (वय 35), शिपाई चेतन गजानन महाजन (32) जखमी झाले आहेत. 

माधवनगर (ता. मिरज) येथील रविवार पेठमधील गोसावी गल्लीत शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन महिलांसह पाचजणांवर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ज्योती शुक्रराज घाडगे (रा. तुपारी, ता. वाळवा), कमल गोसावी, शशिकांत माळी, दीपक शशिकांत माळी, मंगेश गोसावी (रा. सर्व गोसावी गल्ली, रविवार पेठ, माधवनगर) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण करणे या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत जखमी पोलीस चेतन महाजन यांनी फिर्याद दिली आहे. 

शुक्र राज घाडगे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना तो विविध गुन्ह्यामध्ये हवा आहे. शनिवारी रात्री तो माधवनगर येथील गोसावी गल्लीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस शिपाई चेतन महाजन पथकासह रात्री घाडगे याला अटक करण्यासाठी गोसावी गल्लीत गेले होते.

शुक्र राजला अटक करण्यासाठी पोलिस आले असल्याची माहिती घाडगे याच्या पत्नीसह त्याच्या अन्य नातेवाईकांना मिळाली. त्यानंतर ते सर्वजण एकत्र गोळा झाले. पोलिसांना शुक्र राजला अटक करण्यासाठी त्यांनी मज्जाव करत पोलिसांवर अचानकपणे हल्ला चढवला. महिलांनी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पोलिसांना कडाडून चावा  घेतला. या घटनेत पोलिस जखमी झाले.

दरम्यान परिसरात गोंधळ उडाला, गर्दी झाली. याचा फायदा घेत हल्लेखोरांनी पलायन केले. जखमी पोलिस चेतन महाजन आणि सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.