Wed, Apr 24, 2019 20:11होमपेज › Sangli › सोशल मीडियावरील विनापरवाना जाहिरातींवर गुन्हे दाखल होणार

सोशल मीडियावरील विनापरवाना जाहिरातींवर गुन्हे दाखल होणार

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:49PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत सोशल मीडियावर मजकूर, जाहिरात शेअर करण्यापूर्वी त्याची महापालिका तसेच पोलिस प्रशासनामार्फत परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास संबंधितांवर कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिला. निवडणूक आचारसंहिता प्रक्रिया काटेकोर पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी, कर्मचार्‍यांसह पोलिस प्रशासनाची महापालिकेत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. 

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी  निवडणूक अधिकारी, सहायकांसह संबंधितांना कामकाजाबाबत सूचना दिल्या.  निवडणूक अधिकारी उपायुक्‍त बाळासाहेब वाघमोडे, उपनिवडणूक अधिकारी सुनील पवार, स्मृती पाटील, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्यासह पोलिस निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.  बोराटे म्हणाले, निवडणुकीसाठी पोलिस सज्ज आहेत.

यामध्ये निवडणूक आचारसंहितेबाबत प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेचेही काही निकष आहेत. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोतच. पण यामध्ये मोफत समजून सहज प्रसिद्धी करणार्‍या सोशल मीडियावर विशेष नजर ठेवली जाणार आहे. त्यावर मजकूर शेअर करण्यापूर्वी त्याबाबतचा ना हरकत दाखला घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास संबंधित उमेदवारांसह ज्यांनी हा मजकूर पाठविला त्या सर्वांवरच कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले जातील.

ना हरकत प्रमाणपत्रासाठी पोलिस यंत्रणेसह निवडणूक अधिकार्‍यांची मदत घेता येईल.  खेबुडकर म्हणाले, पालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांवर कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सर्व मतदानकेंद्रे आदर्श होतील, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी अरविंद कोळी, किरण कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.