Tue, Apr 23, 2019 02:01होमपेज › Sangli › महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 29 2018 12:26AMमिरज : शहर प्रतिनिधी 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात आमदारांनी चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे भ्रष्टाचाराची सखोल चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचार करणार्‍या घोटाळेबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे पत्रकार बैठकीत दिली. 

मिरज-पंढरपूर रस्त्यावर असणार्‍या आमदार सुरेश खाडे इंग्लिश स्कूलमध्ये भाजपच्या काही मोजक्याच प्रमुख पदाधिकार्‍यांची आज बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे संघटन सरचिटणीस विजय पुराणिक यांनी मार्गदर्शन केले.   

या बैठकीनंतर मंत्री देशमुख यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, महानगरपालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात सखोल चौकशी सुरू आहे,  भ्रष्टाचार करणार्‍या घोटाळेबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे. जर अशा घोटाळेबाजांनी भाजपकडे उमेदवारी मागितली तरी त्यांना ती  देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,  कोणत्याही पक्षामध्ये संघटनमंत्री पद नाही, मात्र ते भाजपमध्ये आहे. तेच या पक्षाचे वेगळेपण आहे. केवळ पदांमध्ये वेगळेपण नाही; तर सरकार म्हणूनही वेगळेपण असले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. 

आज प्रमुख पदाधिकार्‍यांच्या शहर व ग्रामीण अशा बैठका घेण्यात आल्या. राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशा सुचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, महामंडळे यांचा मागोवा घेण्यात आला. सांगलीमध्ये पक्षाच्या प्रदेश  कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्याची तारीख येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

महापालिका निवडणुकीसाठी समिती नियुक्त...

ते पुढे म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी काही पदाधिकार्‍यांवर देण्यात आले आहे. त्या पदाधिकार्‍यांची एक स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे.  आमदार सुधीर गाडगीळ या समितीचे समन्वयक आहेत. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, नीता केळकर, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, शेखर इनामदार  या समितीत आहेत. कोणत्या प्रभागात कोणाला भाजपची उमेदवारी द्यायची, याचा निर्णय ही समिती घेणार आहे.

 दि. 1 मे पासून आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयामध्ये इच्छुकांचे अर्ज मागवले जाणार आहेत.  त्यानंतर सर्वांचे  सर्वेक्षण होईल आणि निवडून येण्याची क्षमता असणार्‍यांना भाजपची उमेदवारी दिली जाईल. 

आता भाजपचा महापौर होईल...

ते म्हणाले, महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भाजपचाच महापौर होईल. यासाठी सर्व टीम काम करणार आहे. शिवसेनेसह सर्व समविचारी पक्षांनाही या निवडणुकीमध्ये सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.शिवसेना निश्चित  आमच्याबरोबर येईल  असा आमचा विश्वास आहे.

भेटवस्तू देणे हा संस्कार...

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी भेटवस्तूंसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल ना. देशमुख म्हणाले, निवडणुकीमध्ये आमिष दाखवू नये हे सत्य आहे. मात्र एखादा पाहुणा आला, मित्र आला की त्याचा आपण सत्कार करतो. हार-श्रीफळ देतो, भेटवस्तू देतो. ही आपली माणुसकी आहे. भेटवस्तू देणे हा तर एक चांगला संस्कार आहे. ना. पाटील यांच्या वक्तव्याचा तो संदर्भ आहे. भाजपमधील जुन्या- नव्या कार्यकर्त्यांच्या वादावर ते म्हणाले, जुन्या व  नव्या कार्यकर्त्यांमध्ये असा वाद असेल किंवा निर्माण झाला तरी त्याबाबतचा योग्य निर्णय प्रदेश कार्यकारिणी घेईल. 

यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार  शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप,  जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे, नीता केळकर, मकरंद देशपांडे, दिनकर पाटील, मोहन वनखंडे आदींसह अनेकजण उपस्थित होते.

Tags : Sangli, Corruption enquiry, municipal corporation, start,