Fri, Aug 23, 2019 14:51होमपेज › Sangli › भ्रष्ट ठेकेदार नगरसेवकांची टोळी रोखणार

भ्रष्ट ठेकेदार नगरसेवकांची टोळी रोखणार

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 1:34AMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेतील त्याच त्या भ्रष्ट ठेकेदार नगरसेवकांची टोळी रोखण्यासाठी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असा दावा मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. अर्थात स्व:बळावर लढायचे की समविचारी पक्षांशी आघाडी करायची, याचा निर्णय लवकरच राज ठाकरे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मनसेने इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे ते म्हणाले. 

ते म्हणाले, महापालिकेत सत्ता बदल झाल्या तरी तेच ते ठेकेदार नगरसेवक, त्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरतात. निवडून आल्यानंतर पुन्हा महापालिकेत भ्रष्टाचाराचा अड्डा चालतो. एकूणच गेल्या 25-30 वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. तरीही या लुटारूंच्या भ्रष्ट कारभाराने सांगलीचे वाटोळे झाले आहे. अपुर्‍या योजना आणि निकृष्ट कारभार याचा आरसा आहे.प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. स्वाती शिंदे म्हणाल्या, महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. परंतु दुर्दैवाने तेच ते दिग्गज नगरसेवक आपापल्या पत्नी, मुलगी, भावजयींना मैदानात उतरवून जागा अडवतात. त्यांच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष कारभारी होतात. महिला भ्रष्ट कारभाराला कुठेच विरोध करीत नाहीत. यांचा लुटीचा अखंड कारभार सुरू आहे. हे चित्र मनसे बदलेल.  

शहराध्यक्ष अमर पडळकर म्हणाले, माजी आमदार या नात्याने श्री. शिंदे आणि अ‍ॅड. सौ. शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली मनपा निवडणूक लढणार आहोत. दुसरे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह आम्ही सर्वजण ताकदीने उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी आदित्य पटवर्धन, सुनीता इनामदार, लीना सावर्डेकर, रोहित घुबडे आदी उपस्थित होते.

दिगंबर जाधव राहिले तरी आणि गेले तरी पॅनेल

सरचिटणीस नितीन सोनावणे म्हणाले, मिरजेत तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव भाजपमध्ये गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु त्यांनी पक्षाला अधिकृत तसे काही कळविले नाही. ते पक्षासोबतच राहतील. शिवाय त्यांच्यासमवेत चारजणांचे पॅनेल मनसे उभे करणार आहे. ते सोबत आले नाहीत तर त्यांच्या विरोधात चारजणांचे पॅनेल उभे राहील.