Thu, Apr 25, 2019 13:53होमपेज › Sangli › शाळा सुरू होण्यापूर्वी बदल्यांतील त्रुटी दुरुस्त करा

शाळा सुरू होण्यापूर्वी बदल्यांतील त्रुटी दुरुस्त करा

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 06 2018 11:56PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील त्रुटी दुरुस्त करा, अशी सुचना ग्रामविकास विभागाचे प्रभारी सचिव श्री. डवले यांनी ‘एनआयसी’ला दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी ग्रामविकासचे प्रभारी सचिव डवले यांची भेट घेतली. शिक्षक बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया करणार्‍या ‘एनआयसी’ टीमसह समक्ष चर्चा झाली. राज्यस्तरावरून झालेल्या शिक्षक बदल्यांमधील त्रुटींकडे सीईओ राऊत यांनी लक्ष वेधले. 

शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरणासाठी ‘कंपलसरी व्हेकंट’ ठेवायच्या पदांवरही बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे रिक्त पदांच्या समानीकरणाचा बोजवारा उडाला आहे. समानीकरणातील त्रुटी दूर होणे आवश्यक असल्याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भात 125 शिक्षकांनी तक्रारी केलेल्या आहेत. बदलीपात्र सिनिअर शिक्षकांनी पसंती दिलेल्या शाळा त्यांना न मिळता कनिष्ठ शिक्षकांना मिळणे, संवर्ग 1 मधून बदली झालेल्या जागा रिक्त ठेवल्याने पसंतीक्रम देऊनही ती शाळा न मिळणे, विषयनिहाय मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक बदलीने येणे व अन्य तक्रारींकडेही राऊत यांनी लक्ष वेधले आहे. 

दरम्यान उन्हाळी सुटीनंतरचे नवे शैक्षणिक वर्ष दि. 15 जूनपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासंदर्भात ग्रामविकासचे प्रभारी सचिव डवले यांनी ‘एनआयसी’ला सुचना दिल्या.