Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Sangli › नगरसेवक सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी

नगरसेवक सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 10:55PMसांगली ः प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांच्या घरासमोर जाऊन त्यांना सत्तूरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुयोग सुतारसह पाचजणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

सुयोग सुतार, तेजस पाटील, शाहबाज रंगारी, प्रसाद महाडिक, राहुल बाबर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नगरसेवक दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. 

शुक्रवारी सायंकाळी मतदारांना भेटण्यासाठी सूर्यवंशी घराबाहेर पडत होते. त्यावेळी सुतार आणि राहुल बाबर त्यांच्या घरासमोर मोटारसायकलवरून आले. त्यावेळी सुतारच्या हातात सत्तूर होता. नंतर मोटारसायकलवरून उतरून सुतारने सूर्यवंशी यांच्याकडे पाहत तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर सूर्यवंशी यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याला कळवली. 

त्यानंतर काही वेळातच सुतार हे रंगारी, महाडिक, पाटील यांच्यासोबत पुन्हा सूर्यवंशी यांच्या घरासमोर आला. त्यावेळी पुन्हा सर्वांनी सूर्यवंशी यांना ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. यावेळी परिसरातील लोक जमा झाल्याने सर्वजण तेथून निघून गेले असेही सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान सप्टेंबर 2014 मध्ये सुतार आणि त्याचा साथीदार उमेश कांबळेने हल्ला केला होता. ती बाब अजूनही न्यायप्रविष्ठ आहे असेही सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सुतारसह पाचजणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मारहाणप्रकरणीही सुतारसह तिघांवर गुन्हा...

शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नगरसेवक सूर्यवंशी याच्यासोबत का फिरतोस, असे म्हणत एकाला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राकेश सुनील ऐनापुरे (वय 28, रा. चांदणी चौक) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सुयोग सुतार, महेश सावंत व एक अनोळखी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐनापुरे मोपेडवरून घरी निघाला असता दामाणी हायस्कूलजवळ तीन संशयितांनी मोटार आडवी मारून त्याला अडवले. सूर्यवंशीसोबत का फिरतोस, असे म्हणून त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. तेथून त्याला त्रिकोनी बागेजवळ सुतारच्या कार्यालयापाशी नेले. तेथे सावंतने त्याला काठीने बेदम मारहाण केली. तसेच सुतार व अन्य संशयिताने शिवीगाळ करून, धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.