Sat, Nov 17, 2018 04:00



होमपेज › Sangli › पूरस्थिती येऊ नये यासाठी समन्वय ठेवा : जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

पूरस्थिती येऊ नये यासाठी समन्वय ठेवा : जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 8:32PM



सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात 2005 प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकार्‍यांनी सतर्कता ठेवावी.  सांगली पाटबंधारे विभागाने कोयना व आलमट्टी धरणाच्या अधिकार्‍यांशी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पावसाळापूर्व आंतरराज्य समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी आलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता एस. एच. मुंजाप्पा, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. बी. पाटील, सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एस. करे, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता एस. ए. मोने,  आलमट्टी धरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. इनामदार, चिकोडीचे तहसीलदार सी. एस. कुलकर्णी,   जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदि उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले,   पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी   धरणाच्या अधिकार्‍यांशी दैनंदिन समन्वय व सुसंवाद ठेवून पाणीपातळी धोकापातळीच्या वर जाऊ नये, यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी.  आवश्यक नियोजन करावे. आलमट्टी धरण, कोयना धरणांची पाणीपातळी तसेच सातारा, कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकमधील पुलांच्या धोकादायक पातळीवर विशेष लक्ष ठेवावे.   2005 सारखी पूरपरिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी. 

पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी  खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली.  आलमट्टी धरण आणि कोयना धरणाच्या अधिकार्‍यांनी धरणाची क्षमता, सद्यस्थितीतील पाणीपातळी, धोकापातळी यांची माहिती दिली.