Wed, May 22, 2019 10:53होमपेज › Sangli › शिराळा तालुक्यात सोयीस्कर आघाड्या

शिराळा तालुक्यात सोयीस्कर आघाड्या

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 9:05PMशिराळा : विठ्ठल नलवडे 

शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राजकीय समिकरणे बदलली आहेत. नेत्यांनी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सोयीनुसार गावागावांत स्थानिक आघाड्यांना हिरवा कंदील दाखविल्याने वेगवेगळ्या राजकीय आघाड्या दिसत आहेत. दरम्यान, या निवडणुकीत  काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तीनही पक्षांनी चांगलीच ताकद पणाला लावली आहे.  सर्वच नेत्यांनी या निवडणुकीत अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्या पक्षाच्या ताब्यात याव्यात यासाठी जोरदार व्यूहरचना केली आहे.आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख या प्रमुख नेत्यांनी निवडणुकीत आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रचार यंत्रणा उभी केली आहे. 

मात्र अनेक ठिकाणी गावपातळीवर कार्यकर्त्यांचे मतभेद नेत्यांची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी विविध पक्षाची आघाडी करण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्येक गावात आघाडीप्रमाणे प्रचाराचे मुद्दे येत आहेत. दरम्यान, या निवडणुकीत बहुसंख्य गावांमधील मोठ्या संख्येने ग्रामस्थांचे मुंबई येथे वास्तव्य असल्याने प्रचार यंत्रणा राबवताना नेते व उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

आता कुसळेवाडी, वाकुर्डे बुद्रुक, प. त. शिराळा, मराठवाडी या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी, शिरसटवाडी, सावंतवाडी, खुजगाव, शिरशी, रांजणवाडी, मेणी या ठिकाणी काँग्रेस व भाजप यांची आघाडी, चिंचेवाडी, रिळे या ठिकाणी काँग्रेस आघाडी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. सावंतवाडी येथे मनसे विरुद्ध तीनही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. करुंगली, धसवाडी, मोरेवाडी येथे बिनविरोधसाठी अजून हालचाली होत आहेत. चिंचेवाडी येथे रुपाली आनंदराव मस्कर यांची थेट सरपंचपदासाठीची उमेदवारी चर्चेत आली आहे. 

तालुक्यात 27 पैकी 17  ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिला आरक्षण आहे. महिला, विविध राखीव जागेसाठीचे उमेदवार उभे करण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागली आहे. शिरसटवाडी, चिंचेवाडी, करुंगली, रांजणवाडी, अस्वलवाडी, फकीरवाडी, चिखलवाडी, इंग्रुळ, भाटशिरगाव, वाकुर्डे बुद्रुक, धसवाडी, सावंतवाडी, मानेवाडी, खुजगाव, पणुंबे्र तर्फ वारुण, खराळे, रिळे, कुसळेवाडी, मराठेवाडी, पाचगणी, मोरेवाडी, शिरशी, कुसाईवाडी, मेणी, बेलेवाडी, आंबेवाडी, मादळगाव या ग्रामपंचायतींसाठी 205 सदस्य व  सरपंचांच्या 27 जागांसाठी तसेच भैरेवाडी, ढोलेवाडी, खुंदलापूर, शिवरवाडी, वाकाईवाडी येथील 8 सदस्य व शिंदेवाडी सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, पवारवाडीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. 

राजकीय सत्तासंघर्ष लक्षवेधी

शिरशी, इंग्रुळ, भाटशिरगाव, वाकुर्डे बुद्रुक, पणुंब्रे तर्फ वारुण, रिळे या प्रमुख गावांमध्ये होणारी निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. सध्या काँग्रेसकडे 10, राष्ट्रवादी काँग्रेस 7, भाजप 5, भाजप-राष्ट्रवादी आघाडी 2, काँग्रेस आघाडी 1, मनसे 1  तर काँग्रेस आघाडी व भाजप असे तीनही पक्षांच्या आघाडीकडे 1 अशी सत्ता आहे.