Wed, Apr 24, 2019 16:14होमपेज › Sangli › तासगाव पालिका सभेत वादावादी

तासगाव पालिका सभेत वादावादी

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:30PMतासगाव : शहर प्रतिनिधी

नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या  सभेत स्वच्छतेच्या ठेक्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत खडाजंगी झाली. स्वच्छता होत नसल्याने व पालिकेची बदनामी होत असल्याने  ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी पुढील सभेत ठेक्याबाबत योग्य ती कारवाई करू, असे आश्‍वासन दिले.

अडीच महिन्यानंतर पालिकेची सभा झाली.  उपनगराध्यक्ष दीपाली पाटील, मुख्याधिकारी अभिजित वायकोस  उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन होत असताना, स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा विषय चर्चेला आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित माळी आणि बाळासाहेब सावंत यांनी  स्वच्छता ठेक्याचा प्रश्‍न उपस्थित केला. शहरात स्वच्छता व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नागरिक नाराज आहेत, असे ते म्हणाले. 

नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी मध्यस्थी केली. शहरात स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी समिती येणार आहे. ठेका रद्द करुन दुसरा  नेमणे सोपे नाही.  अचानक ठेका रद्दचा निर्णय घेणे योग्य नाही. पुढील सभेत याबाबत योग्य ती कारवाई करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

साडे तीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मुदतवाढ मागण्याचा ठराव झाला. शहरात स्वच्छतेसाठी कमी दराची जेसीबी भाड्याने घेण्याची, तसेच डस्टबीन खरेदीची कमी दराची निविदा यावेळी मंजूर करण्यात आली. शहरातील निकामी शौचालये निर्लेखित करण्यासह सात विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.