Wed, Nov 14, 2018 19:16



होमपेज › Sangli › कंटेनर-टेम्पोंच्या धडकेत दोन ठार

कंटेनर-टेम्पोंच्या धडकेत दोन ठार

Published On: Aug 19 2018 1:33AM | Last Updated: Aug 18 2018 11:57PM



इस्लामपूर : वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ थांबलेल्या कंटेनरला टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने  दोघेजण जागीच ठार झाले.  टेम्पोचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी पहाटे झाला.  कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघातातील मृत बेळगाव जिल्ह्यातील आहेत. 

शहाहुसेन शब्बीर शेख (वय 26, रा. अंकलीखूर, ता. चिकोडी) आणि त्याचा मावसभाऊ सोहेल दस्तगीर मुरगुडे (वय 24, रा. खानापूर, जि. बेळगाव) अशी  मृतांची नावे आहेत. टेम्पोचालक मोहम्मद सलाउद्दीन सरदार देसाई (वय 39, रा. मेहबूबनगर, ता. चिकोडी) जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  देसाई  हे टेम्पो (एम.एच.48/टी-5342) घेऊन  बेळगावकडे निघाले होते. टेम्पोमध्ये टेम्पो मालकाचा मुलगा शहाहुसेन शेख व त्याचा मावसभाऊ सोहेल मुरगुडे बसले होते. 

वाघवाडी फाट्याजवळ वारणा कालवे कार्यालयासमोर रस्त्याकडेला एक कंटेनर उभा होता.  या टेम्पोची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक बसली. या धडकेत बाजूला  बसलेले शहाहुसेन व सोहेल  जागीच ठार झाले. 

अपघातात टेम्पोच्या केबीनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. चालक देसाई  केबीनमध्येच जखमी अवस्थेत अडकून पडले होते. काही वेळाने हाय-वे पेट्रोलिंगचे पोलिस निरीक्षक विकास माने, मधुकर साळुंखे, हर्षद माळी यांनी जखमी व मृतांना बाहेर काढले.