Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Sangli › जिल्ह्यात रक्‍त तपासणी केंद्रांचे पेव

जिल्ह्यात रक्‍त तपासणी केंद्रांचे पेव

Published On: Aug 30 2018 1:29AM | Last Updated: Aug 29 2018 8:49PMसांगली : गणेश कांबळे

रक्‍त वा तत्सम तपासण्यांमध्ये प्रचंड फायदा असल्याने सांगली जिल्ह्यात रक्‍त तपासणी केंद्राचे पेव फुटले आहे. खेडोपाड्यात तसेच शहरात मोठ्या प्रमाणात केंद्रे निर्माण झालेली आहे. रुग्णांना भीती दाखवून अनावश्यक तपासण्या करण्यास भाग पाडले जाते. यामधून भरमसाठ फायदा कमावला जातो. 

वास्तविक  या तपासण्या पॅथॉलॉजीमधील अधिकृत पदवीधरांकडूनच करणे गरजेचे असते. परंतु केवळ लॅब टेक्निशियनचा कोर्स केलेलेही आता लॅब काढून पैसे कमावत आहेत. सांगली जिल्ह्यात 70 टक्के लॅब  बेकायदेशीर असल्याचा दावा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव, डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना केला.

सर्वोच्च न्यायालयाने दि.12 डिसेंबर 2017 रोजी पॅथॉलॉजीबाबत आदेश काढलेला आहे. त्यामध्ये त्यांनी पॅथॉलॉजीच्या सर्व तपासण्या करण्याची परवानगी अधिकृत पदवीधारकांनाच दिलेली आहे. यामध्ये एम.डी. पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी, डिप्लोमा इन क्‍लिनिकल पॅथॉलॉजी (डीसीपी), डिप्लोमा इन पॅथॉलॉजी अँड बॅक्टेरियालॉजी यांचा समावेश आहे. 

या तज्ज्ञ व्यक्‍तींच्या देखरेखीखाली यंत्रसामुग्रीची सर्व तपासणी करावयाची असतेे. त्याला इंटर्नल क्‍वॉलिटी कंट्रोल म्हणतात. त्यांना लॅबमध्ये झालेल्या तपासणीचा डाटा एकत्र करून त्याचा निर्णय द्यावयाचा असतो. त्याचबरोबर निदानासंबंधीही स्वत:चे मतही प्रदर्शित करून नंतरच रिपोर्टवर सही करावयाची असते. इतकी जबाबदारी ही अधिकृत पॅथॉलॉजिस्टची असते. 

ते म्हणाले, सांगली जिल्ह्याचा विचार केल्यास सांगली व मिरज तसेच परिसरात केवळ 40 ते 50 पॅथॉलॉजीस्टची अधिकृत लॅब आहेत. अन्य तालुक्यांमध्ये मिळून 30 अशा एकूण 80 लॅब आहेत. ही लॅब अधिकृत पदवी असणार्‍या पॅथॉलॉजीस्ट चालवित असतात. परंतु केवळ लॅब टेक्निशियनचा कोर्स पूर्ण केलेले अनेकजण जिल्ह्यात लॅब सुरू करून तपासणी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची संख्या 500 च्या वर आहे. हे टेक्निशियन जिल्ह्यात ठिकठिकाणी रुग्णांची तपासणी करून त्यांचे सॅम्पल अधिकृत पॅथॉलॉजीस्टकडे पाठवित असतात. त्यांची सही घेऊन मग ते रुग्णांना देत असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अशा चुकीच्या यंत्रणेला हातभार लावणारे तज्ज्ञ पॅथॉलॉजीस्टही जबाबदार आहेत. टेक्निशियननी सहा महिन्यांचे, एक वर्षाचे कोर्स पूर्ण करून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. पुणे, मुंबई येथे तर केवळ 15 दिवसांचे कोर्स पूर्ण करून व्यवसाय सुरू केल्याची उदाहरणे आहेत. लॅबमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करून नंतर रुग्णांच्या अनावश्यक तपासण्या करून पैसे काढण्याचे प्रकार घडत आहेत. 

कायदा व सरकारचे नियंत्रण नाही

रुग्णांची तपासणी कोणी करावी, याचे नियम सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेले आहेत. परंतु लॅब कोणी सुरू करावी याबाबत मात्र कोणतेही बंधन सरकारने केलेले नाही. त्यामुळे लॅबबाबत कोणतेही रजिस्ट्रेशन नाही.  त्यांचा डाटा ठेवला जात नाही. काहीजणांनी तर शॉप अ‍ॅक्टचे लायसन्ससुद्धा काढलेले नसते. याचा परिणाम म्हणून कोणीही लॅब सुरू करून रुग्णांची तपासणी करण्याचे प्रकार सुरू आहेत. रिपोर्टवर अधिकृत सहीसाठी मात्र त्यांना कोणतातरी अधिकृत पॅथॉलॉजीस्टकडे जावे लागते.  काही पॅथॉलॉजीस्ट अशा प्रकाराला बळी पडत असल्याचे समोर आलेले आहे. 

कार्पोरेट मेडिकल प्रॅक्टिसमुळे रुग्णांचे शोषण

येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, सध्या रुग्णसेवेऐवजी कार्पोरेट मेडिकल प्रॅक्टिसच्या माध्यमातून रुग्णांची लूट केल्याचे दिसत आहे. मेडिकल क्षेत्रातील कंपन्यांकडून पॅथॉलॉजीस्टना मशिनरी, केमिकलचा पुरवठा होत असतो. काही मोठ्या कंपन्या यामध्ये गुंतवणूक करीत असतात. त्यामुळे केवळ पैसा मिळविण्यासाठी म्हणून रुग्णांच्या अनावश्यक तपासण्या करण्याचा प्रकार दिसत आहे. तपासण्याचे दर किती असावेत, याबाबत कोणाचेही नियंत्रण नाही.

सिव्हिलमध्ये सर्व तपासण्या होण्याची आवश्यकता

सध्या रक्‍तदाब, हृदयविकार, मधुमेह यासह अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी रुग्णांना अनेक तपासण्या कराव्या लागतात. त्यांची खासगी लॅबमधून मोठ्या प्रमाणात लूट होत असते. याचा विचार करता शासकीय रुग्णालयात रक्‍ताच्या तसेच सर्व प्रकारच्या तपासण्या होणे आवश्यक आहे. परंतु शासकीय रुग्णालयातच साखळी तयार झाल्याच्या तक्रारी रुग्णांकडून होत आहेत. तेथून रुग्णांना तपासण्यासाठी खासगी लॅबकडे पाठविले जाते. यामध्ये त्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सर्व तपासण्या शासकीय रुग्णालयात कमी खर्चात झाल्या तर रुग्णांची होणारी लूट थांबणार आहे. 

लॅबमध्ये दरपत्रकच नाही

लॅबमध्ये प्रत्येक तपासणीचे दरपत्रक लावणे गरजेचे असते. परंतु काही ठराविक लॅब वगळता अन्यत्र कोणत्याही प्रकारचे दरपत्रक लावलेले दिसत नाही. पॅथॉलॉजिस्ट जे सांगतील तोच दर अंतिम असतो. गेल्या तीन वर्षांत विविध तपासण्यांचे दर हे तिप्पट झाले आहेत. पूर्वी शुगर ही 40 रुपयांमध्ये तपासली जात होती. आता त्याचे शुल्क 100 रुपये झाले आहे.