Sat, Apr 20, 2019 18:41होमपेज › Sangli › बांधकाम सभापती उपअभियंत्यांवर भडकले

बांधकाम सभापती उपअभियंत्यांवर भडकले

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 10:43PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतून  सन 2018-19 साठी 505 रस्ते कामांचा 134 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा बांधकाम सभापती अरूण राजमाने यांच्या परस्परच जिल्हा नियोजन समितीकडे सादर झाला आहे. शिवाय चार तालुक्यातील बर्‍याच सदस्यांना विश्‍वासात घेतले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सभापती राजमाने हे उपअभियंत्यांवर भलतेच भडकले. 
पंचायत समितींच्या उपअभियंत्यांची गुरूवारी तातडीने बैठक घेतली. प्रारूप यादीत नव्याने कामे समावेश करण्याचा निर्णय झाला. 

जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग सुधारणा व मजबुतीकरणासाठी निधी मिळतो. सन 2018-19 च्या वार्षिक योजनेतून निधीसाठी जिल्हा परिषदेने रस्ते कामांचा प्रारूप आराखडा तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. या प्रारूप आराखड्यात 301 ग्रामीण मार्ग (रक्कम 71.43 कोटी) व 204 इतर जिल्हा मार्गांच्या (63.02 कोटी रुपये) कामांचा समावेश आहे. एकूण 134.45 कोटी रुपयांच्या 505 कामांचा समावेश आहे. 

दरम्यान हा प्रारूप आराखडा तयार करताना जिल्हा परिषद सदस्यांना विश्‍वासात घेणे आवश्यक होते. मात्र मिरज, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील बर्‍याच सदस्यांनी विश्‍वासात घेतले नसल्याची तक्रार सभापती राजमाने यांच्याकडे केली. सभापती राजमाने यांनाही हा प्रारूप आराखडा पहावयास मिळाला नव्हता. मिरज तालुक्यातील कोणत्या गावातील किती रस्ते आराखड्यात समाविष्ट केले आहेत याचीही माहिती राजमाने यांना दिलेली नव्हती. त्यामुळे सभापती राजमाने उपअभियंत्यांवर भलतेच भडकले. 

राजमाने यांनी पंचायत समितींच्या सर्व उपसभापतींची तातडीची बैठक गुरूवारी घेतली. सभापती व सदस्यांनाही विश्‍वासात घेतले नसल्यावरून राजमाने यांनी उपअभियंत्यांना धारेवर धरले. दरम्यान सभापती व सदस्यांनी सुचविलेल्या कामांचा समावेश प्रारुप आराखड्यात केला जाईल, असे कार्यकारी अभियंता संजय माळी यांनी स्पष्ट केले.