Tue, May 21, 2019 04:23होमपेज › Sangli › सांगलीत धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारू

सांगलीत धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारू

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 11:27PMसांगली : प्रतिनिधी

धनगर समाजातील  विद्यार्थ्यांसाठी येथे  लवकरच  सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येईल, असे आश्‍वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी शनिवारी  दिले. सांगलीतील पुण्यश्वोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारकही लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.समस्त धनगर समाजाच्यावतीने समाजातील नूतन 13 नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गाडगीळ बोलत होते. 

स्वागताध्यक्ष तात्यासाहेब गडदे, महापौर संगीता खोत, भाजप नेते शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, विठ्ठल खोत, सौ. प्रभाताई गडदे यांच्यासह समाजातील मान्यवर  उपस्थित होते.आमदार गाडगीळ म्हणाले, निवडणूक झाली. आता तुम्ही समाजाचे नव्हे; तर सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहात. आपण प्रभागाचे नगरसेवक आहोत, हे लक्षात ठेवून गटबाजी, पक्षपातीपणा न करता ‘सबका साथ, सबका विकास’ या भाजपच्या ब्रीदवाक्यानुसार नागरिकांची कामे करा. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी एकदिलाने  सांगलीचे वैभव परत मिळवण्यासाठी  काम करुया.

ते म्हणाले, समाजातील सर्वच नगरसेवक आणि समाजबांधवांची अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी आहे. ती आम्ही निश्‍चित पूर्ण करू. एवढेच नव्हे तर जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी ओबीसी समाजाचे पहिले वसतिगृह सांगलीला देऊ, अशी घोषणा केली आहे. आता सर्व धनगर समाजाच्या नगरसेवकांनी एकदिलाने जागा निश्‍चित करू. लवकरच धनगर समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह वर्षभरात उभे करू. 

महापौर  खोत म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार गाडगीळ, आमदार सुरेश  खाडे यांनी  भाजपच्या  पहिल्या महापौरपदाचा मान  माझ्यासारख्या  धनगर समाजातील स्त्रीला दिला. अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम आम्ही सुरू केले होते, ते आम्हीच या सत्तेत पूर्ण करू. भाजपची सत्ता आल्याचे पहिले बक्षीस 100 कोटी रुपये शासनाकडून महापालिकेला मिळाले आहे. वित्त आयोगातूनही 25 कोटी आले आहेत. आता विकासकामांना निधी कमी पडणार नाही. फक्‍त योग्य नियोजन करून सर्वांगिण विकासाचा प्रयत्न करू. 

शेखर इनामदार म्हणाले, आरक्षणातून धनगर समाजाला उमेदवारी दिलीच. तसेच खुल्या प्रवर्गातही दिली. धनगर समाजाचे 14, तर  मुस्लिम समाजाचे 9 उमेदवार आम्ही उभे केले. भाजपच खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष पक्ष आहे हे दाखवून दिले आहे. शहराच्या विकासाठी निश्‍चित योजना आखल्या जातील. 

नीता केळकर, नगरसेवक विष्णू माने, प्रकाश ढंग, गजानन आलदर, कल्पना कोळेकर, सविता मदने  आदींची भाषणे झाली.  तात्यासाहेब गडदे यांनी प्रास्ताविक केले .बाळासाहेब फोंडे यांनी आभार   मानले.    विजय  कडणे यांनी सूत्रसंचालन केले.

आरक्षणासाठी 3 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

आमदार गाडगीळ म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजप सकारात्मक आहे. पण ते न्यायालयात टिकले पाहिजे,  यासाठी कायदेशीर पूर्तता करून प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात  दि.3 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. सौ. नीता केळकर म्हणाल्या, आरक्षण नुसते जाहीर करून सरकार गप्प बसणार नाही, तर ते याच सत्तेच्या काळात दिल्याशिवायही राहणार नाही.