होमपेज › Sangli › महापालिकेत राष्ट्रवादीशी आघाडी नको

महापालिकेत राष्ट्रवादीशी आघाडी नको

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 12:36AMसांगली : प्रतिनिधी 

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करू नये, अशी मागणी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी  बुधवारी पक्षाच्या बैठकीत केली. तसेच निष्ठावंत व तळागाळातील कार्यकर्त्यांना डावलल्यास वेगळा विचार करू, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. पदे भोगलेल्यांनी आता थांबावे, अशी स्पष्ट शब्दांत अनेकांनी मागणी  केली. 

शहर काँग्रेसने महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. इच्छुक उमेदवारांनी या बैठकीला गर्दी केली होती. काँग्रेसचे नेते डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, विशाल पाटील आदी प्रमुख उपस्थिती होते. 

किरणराज कांबळे म्हणाले, नेत्यांनी आता नातेवाईक, सगेसोयर्‍यांना तिकीट देणे बंद करावे. उमेदवारीसाठी घराणेशाही थांबली पाहिजे. कय्युम पटवेगार म्हणाले, निष्ठावंत उमेदवारांना पक्षाने न्याय देण्याची वेळ आली आहे. अतुल माने म्हणाले, उमेदवारीबाबत पक्षाने वेळेत निर्णय घ्यावा. निष्ठावंत उमेदवारांना डावलल्यास वेगळा विचार केला जाईल. 

सिध्दार्थ कुदळे, महादेव नलवडे म्हणाले, नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देता तळागाळातील राबणार्‍या कार्यकर्त्यांना संधी दिल्यास पक्षाला यश मिळेल. बाहुबली कबाडगे म्हणाले, इतर कोणत्याही पक्षांशी आघाडी करण्याऐवजी काँग्रेसचे निष्ठेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा नेत्यांनी गांभिर्याने विचार करावा. अन्यथा याचा फटका बसेल. 

अण्णासाहेब उपाध्ये, रत्नाकर नांगरे म्हणाले, राष्ट्रवादीशी आघाडी करू नये. तसे केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. स्वबळावर लढल्यास पक्षाला निश्‍चितच फायदा होईल. मोठी पदे भोगलेल्यांनी आता थांबण्याची वेळ आली आहे. अशांनी प्रभागाची जबाबदारी घ्यावी. नितीन चव्हाण म्हणाले,  भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्याचा फायदा नेत्यांनी उठवावा. 

माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर म्हणाले, पदे घेतलेल्या आम्हा सर्वांची निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी  आता थांबण्याची तयारी आहे.  नगरसेविका अनारकली कुरणे म्हणाल्या, पक्षातील बंडखोरी थांबविण्याबाबत नेत्यांनी योग्यवेळी निर्णय घ्यावा.  शेवंता वाघमारे म्हणाल्या, राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास काँग्रेसमध्ये निर्माण होणार्‍या असंतोषाचा  फायदा भाजप घेईल. 

सुशिल हडदरे म्हणाले, काहीजण पक्षापेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत. त्यांच्यामुळे पक्ष प्रभागात अडचणीत येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेच्या भावना जाणूनच निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी.

सुभाष खोत म्हणाले, भाजपच्या लाटेपुढे गांगरुन जाऊ नका. डॉ. पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या विचारांना बळकट करण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकावीच लागेल. बैठकीला  महापौर हारुण शिकलगार, माजी महापौर किशोर शहा, गट नेते किशोर जामदार,  राजेश नाईक, संतोष पाटील, उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, दिलीप पाटील, मयूर पाटील,  अमर निंबाळकर,  किशोर लाटणे, अजय देशमुख,  डॉ. नामदेव कस्तुरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.