Tue, May 21, 2019 04:42होमपेज › Sangli › मनपा निवडणूकः नेतृत्व जयश्री पाटील यांच्याकडे

मनपा निवडणूकः नेतृत्व जयश्री पाटील यांच्याकडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

काँग्रेसनेते डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांची महापालिका निवडणुकीत मोठी उणीव भासणार आहे. तरीही काँग्रेस ही निवडणूक जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढेल. पुन्हा काँग्रेसचाच महापालिकेवर झेंडा फडकेल, असा विश्‍वास युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी व्यक्‍त केला. 

पुणे येथे महापालिका निवडणुकीच्या पाशर्वभूमीवर त्यांनी पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.  दि. 15 एप्रिलनंतर यासंदर्भात प्रभागनिहाय नियोजनासाठी बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील आदि उपस्थित होते. कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना पूर्ण ताकद देणार असल्याचे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले. निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असेही त्यांनी  सांगितले. यावेळी यांनी महापालिकेची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीची माहिती घेतली. अन्य पक्षांच्या राजकीय हालचालींचा आढावाही त्यांनी घेतला. 

कदम म्हणाले, महापालिकेची गेली निवडणूक डॉ. कदम आणि मदन पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली पक्षाने  एकतर्फी जिंकली होती. आता त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठी उणीव जाणवणार आहे. तरीही त्यांचा कार्यकर्तृत्वाचा वारसा आपण पुढे एकसंधपणे आणि ताकदीने चालवू. कठीण प्रसंग असला तरी काँग्रेसची ताकद मोठी आहे. विकासकामांमुळे जनता काँग्रेसच्याच पाठीशी राहील. 

ते म्हणाले, मदन पाटील यांच्या पश्चात जयश्री पाटील याच महापालिकेचे नेतृत्व करीत होत्या. त्यानुसार आताही ही निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे. मात्र सर्वच काँग्रेसचे स्थानिक व प्रदेशचे नेते निवडणुकीत सक्रिय होऊन त्यांना मदत करतील. यासाठी आता येत्या 15 एप्रिलनंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, जयश्री पाटील, माजी खासदार प्रतिक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार यांच्यासमवेत मी प्रभाग निहाय बैठका घेऊन इच्छुकांची माहिती घेणार आहे. दोन टप्प्यात प्रभागनिहाय अंदाज घेऊन  सर्वानुमते सक्षम उमेदवारांचे पॅनेल ठरवू. याद्वारे काँग्रेस पुन्हा बहुमताने विजयी होईल.

निवडणुकीसाठी कोअर कमिटी

ते म्हणाले, काँग्रेसच्या पक्ष परंपरेनुसार महापालिका निवडणुकीसाठी कोअर कमिटी नेमण्यात येणार आहे. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष, पक्षनिरीक्षक, महापौर, केंद्रीय समिती सदस्य, प्रदेश सदस्य, माजी खासदार आदींचा समावेश असेल. ही समितीच निवडणुकीसाठी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेणे, त्यांची नावे अंतिम करणे तसेच  त्यांचे अर्ज भरणे अशी  प्रक्रिया पार पाडणार आहे. 

Tags  : Sangli, Sangli News, Congress, fight, hard, leadership, Jayashree Patil, election.


  •