Wed, Jul 17, 2019 00:03होमपेज › Sangli › काँग्रेसचे रविवारी जोरदार शक्‍तिप्रदर्शन

काँग्रेसचे रविवारी जोरदार शक्‍तिप्रदर्शन

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 11:42PMसांगली : प्रतिनिधी

माळबंगला येथील 70 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राच्या  लोकार्पण सोहळ्यानिमित्त काँग्रेस पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन करू. पोकळ आश्‍वासने देणार्‍या भाजपची यानिमित्ताने हवाच काढू, असा निर्धार काँग्रेस नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी काँग्रेस कमिटी बैठकीत केला. येत्या 27 मे रोजी (रविवार) याद्वारे काँगेसच्या महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. 

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत काँग्रेसने जलशुद्धिकरण केंद्र  उद्घाटनाचे श्रेय घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी येत्या रविवारी (दि. 27) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीसाठी सोमवारी काँग्रेस कमिटीत शहर जिल्हाध्यक्ष पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, माजी सभापती संतोष पाटील, नगरसेविका मृणाल पाटील, रोहिणी पाटील, दिलीप पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, राजेश नाईक, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, शेवंता वाघमारे, चेतन पाटील, बिपीन कदम आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले,  70 एमएलडी प्रकल्पामुळे शहराला शुध्द मुबलक पाणी मिळणार आहे. अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. एकूण 126 एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. एकूण खर्च 130 कोटी आला आहे. यासह 24 कोटी रुपयांचे रस्ते, ड्रेनेज योजना, उद्याने आदी कामांमुळे काँगे्रसच मनपा निवडणुकीत सक्षम पर्याय आहे. भाजप सर्व्हेमध्ये कुठेच पोहोचला नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निवडणुकीची रणशिंग फुंकणार आहोत.