Sun, Nov 18, 2018 11:19होमपेज › Sangli › महामार्गाविरोधात मिरजेत काँग्रेसचे रास्तारोको

महामार्गाविरोधात मिरजेत काँग्रेसचे रास्तारोको

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 10:27PMमिरज : प्रतिनिधी

प्रस्तावित रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गात आमदार सुरेश खाडे यांनी बदल केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव व काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रा. सिद्धार्थ जाधव म्हणाले, आ. खाडे यांनी सुडाचे राजकारण करू नये, आज ते शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहेत. भजन-कीर्तन करण्यापेक्षा शेतकर्‍यांना पैसे भरा, असे सांगत आहेत. जिथे रस्ताच नाही तेथे पूल उभारण्याचे उद्योग चालू आहेत. आमदार हे मतदार संघातील जनतेचे सेवक असतात. परंतु आ. खाडे यांना माहिती नाही की, आता जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. तसेच शेतकर्‍यांना पाहिजे तोच महामार्ग सरकारने करावा.  जमिनी सरकारच्या नाहीत, तर त्या शेतकर्‍यांच्या आहेत.

अनिल आमटवणे म्हणाले, आमदार खाडे जे जनतेच्या बाजूने काम करतात त्यांच्या पाठीमागे लागले आहेत. मिरजेसारख्या मतदारसंघाचे त्यांनी वाटोळे केले आहे. येथून पुढे आम्ही जनतेसाठी सतत आंदोलने करणार असून आमदारांच्या दबावाला बळी पडणार नाही.

मालगावचे शेतकरी किशोर सावंत म्हणाले, आ. खाडे यांनी आता आमच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे काम चालू केले आहे. फक्त स्वत:च्या फायद्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरले आहे.  आंदोलनात अण्णासाहेब कोरे, महेश खराडे, नामदेव करगणे, नगरसेवक संजय मेंढे, सचिन जाधव, संकेत परब, अनिकेत परब, बी. आर. पाटील, गणेश दुर्गाडे, किशोर सावंत, अनिल ऐळझरे, गौतम नागरगोजे सहभागी झाले होते.