Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Sangli › भाजपचे मेक इन नव्हे ‘डिस्ट्रॉय इन इंडिया’

भाजपचे मेक इन नव्हे ‘डिस्ट्रॉय इन इंडिया’

Published On: May 27 2018 1:22AM | Last Updated: May 26 2018 11:14PMसांगली : प्रतिनिधी

खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या  केंद्रातील  मोदी सरकारने जनतेचा चार वर्षांत विश्‍वासघात केला आहे. समृद्ध भारतात मेक इन नव्हे; तर डिस्ट्रॉय इन सुरू आहे, असा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. भाजप सरकारच्या चार वर्षेपूर्तीनिमित्त काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शहरातून विश्‍वासघातदिनानिमित्त मूकमोर्चा काढला.

मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. मारुती रस्ता, हरभट रोड, महापालिका, राजवाडा ते स्टेशन चौक महात्मा गांधी पुतळा असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रा. सिद्धार्थ जाधव, नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, संतोष पाटील, अतुल माने, सचिन कदम, युवकचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंगेश  चव्हाण, चिंटू पवार, अमोल झांबरे, महाबळेश्‍वर चौगुले, राजन पिराळे, माजी महापौर कांचन कांबळे, प्रतीक्षा सोनावणे, अनारकली कुरणे, श्‍वेता सेठ, शेवंता वाघमारे, सुवर्णा पाटील, कय्यूम पटवेगार, अमित पारेकर आदींसह शहर व ग्रामीणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

पृथ्वीराज पाटील  म्हणाले, देशात  अच्छे दिन आणू म्हणणार्‍या भाजपने चार वर्षांत जनतेच्या अपेक्षांना सुरुंग लावून बुरे दिन आणले आहेत. सर्वच क्षेत्रात अपयशाचा पाढा सुरू आहे. नीरव मोदी, मल्ल्यापासून अनेक बुडव्यांचे थेट भाजपशी लागेबांधे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई  झाली नाही. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेकारी कमी करू म्हणणार्‍या सरकारने उद्योग-व्यवसायांवर करांचा बोजा लादून  बेकारी वाढविली आहे. जीएसटी, नोटाबंदीसारख्या धक्क्यातून जनता अजून बाहेर आली नाही. शेतीमालाला हमीभाव नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र पंतप्रधानांसह अनेक मंत्री परदेशवार्‍यांत मग्न आहेत. 

ते म्हणाले, सर्व पातळ्यांवर अपयशाने रोष वाढत आहे. मात्र भाजप सत्तेच्या जोरावर ईव्हीएम मशीनच मॅनेज करून दडपशाही करीत आहे. एकूणच देशाची  वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. त्यामुळे हैराण जनतेकडून आता या सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. याचा निवडणुकीत जनता हिशेब करेल.