Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Sangli › काँगे्रसचा आता वॉर्डनिहाय धडाका

काँगे्रसचा आता वॉर्डनिहाय धडाका

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: May 31 2018 10:06PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रा तसेच भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, शक्‍तिप्रदर्शन होणार आहे. यापाठोपाठ आता काँग्रेसनेही वॉर्डनिहाय प्रचाराचा धडाका सुरू करण्याची तयारी केली आहे. रविवारपासून (दि. 3 जानेवारी) जनसंपर्क प्रभागात जनसंपर्क बैठकांद्वारे अभियान राबविणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात सोमवारी काँग्रेस कमिटीत नगरसेवक, इच्छुक उमेदवार, पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. 

ते म्हणाले, दररोज एका प्रभागात दोन बैठका घेऊन  मनपा सत्तेतून केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडणार आहोत. सोबतच प्रभागातील अडचणी, गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांच्या सत्तेत प्रभागनिहाय विकास आराखडा करणार आहोत. तीनही शहरासाठी काँग्रेसचा वचननामा असेल. वर्षानिहाय अंदाजपत्रकात तरतूद करून त्याच्या अंमलबजावणीचा शब्द असेल.पाटील म्हणाले, पाच वर्षांत ड्रेनेज, घरकुल, पाणीपुरवठा अशा विविध योजना राबविल्या. स्थानिक निधी आणि 24 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते, गटारींसह विविध विकासकामांद्वारे शहराचा कायापालट केला आहे. एकूणच मागील निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची वचनपूर्ती आहे. 

ते म्हणाले, यासाठीच आता लोकसंपर्क अभियानाद्वारे प्रभागनिहाय उमेदवारी छाननी, लोकांच्या वॉर्डनिहाय समस्यांचा आढावा घेणार आहे. या अभियानात माझ्यासमवेत काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, युवानेते विशाल पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार  व अन्य पदाधिकारी, जिल्हा, ब्लॉक कमिटी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी सहभागी आहेत. 

पाटील म्हणाले, या बैठकीत जनतेसमोर प्रभागनिहाय लेखाजोखा मांडूच. सोबत जनतेच्या  उमेदवारीबाबतच्या अपेक्षा जाणून घेणार आहोत. त्यानुसार उमेदवारी निश्‍चितीबरोबरच पक्षाच्या उमेदवाराचा वॉर्ड विकास आराखडाच त्यांच्या अजेंड्यातून मांडू. तीनही शहरांसाठी काँगे्रसचा वचननामा हा पाच वर्षांचा विकास आराखडा असेल. यासंदर्भात त्या-त्या प्रभागातील आजी-माजी नगरसेवक, इच्छुकांना ठिकाणे निश्‍चित करून आणि नियोजनाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले,  कार्यकर्त्यांना बूथनिहाय नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. एक बूथ 10 युथ, सोबत महिला, सर्व सेलचे पदाधिकार्‍यांचा समावेश असेल. एका प्रभागाला 4 सहाय्यक व 1 प्रमुख समन्वयक असेल.

शक्‍तिप्रदर्शन, समर्थनाला मज्जाव

पाटील म्हणाले, दररोज एका प्रभागात दोन या पद्धतीने प्रभागनिहाय बैठकांद्वारे प्रचारासाठी नियोजन करण्याच्या नगरसेवक, इच्छुकांना सूचना दिल्या. पण ते करताना कोणत्याही प्रकारे इच्छुकांनी बैठकांमध्ये शक्‍तिप्रदर्शन, समर्थनाचा प्रकार करू नये, असेही स्पष्ट केले आहे.  इच्छुकांकडून अर्ज घेतले आहेत. त्यानुसार उमेदवारीसाठी भूमिका जाणून घेत सर्वानुमते प्रभागनिहाय उमेदवार ठरवून पॅनेल करू.