Mon, Aug 19, 2019 07:00होमपेज › Sangli › बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद 

बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद 

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 11 2018 12:06AMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेसने महागाईविरोधात पुकारलेल्या बंदला सांगली, मिरज, इस्लामपूर शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमुळे काही काळ वाहतूक व उलाढाल ठप्प झाली. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व तालुक्यांत अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. 

सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी रॅली काढून बंदचे आवाहन केले. कापड पेठ, सराफ पेठ, गणपती पेठ, मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळमार्केट, विश्रामबाग, सांगली-मिरज रोड या परिसरातील दुकाने काही वेळ बंद होती. मिरज  शहरातही आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. सांगली  मार्केट यार्डात ‘भारत बंद’चा फारसा परिणाम  दिसला  नाही.

मात्र  व्यापारी, अडते, शेतकरी, ग्राहकांची वर्दळ थोडी कमी होती. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये बंदचा कमी परिणाम दिसून आला. कांदा, बटाटा व शेतीमाल घेऊन वाहने मार्केटमध्ये आली  होती. मंगळवारी शेतीमालाच्या आवकेवर काही प्रमाणात परिणाम दिसून येईल. 

बुधगाव, कवलापूर व बिसूर परिसरात बंदला प्रतिसाद मिळाला. सकाळी 9 वाजल्यापासून तीनही गावांतील सर्व दुकाने  व व्यवहार बंद होती. बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मिरज तालुक्यातील पूर्वभागात अनेक गावांत बंद  शांततेत झाला. शिराळा तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बसस्थानक परिसर, सोमवार पेठ, गुरुवार पेठ, आदी ठिकाणी दुपारपर्यंत दुकाने बंद होती. येथील आठवडा बाजार दुपारी सुरू झाला. एसटी वाहतूक सुरू होती. 

इस्लामपूर शहर व वाळवा तालुक्यात राजेंद्र शिंदे, जितेंद्र पाटील, मनीषा रोटे, आर.आर.पाटील यांनी शहरात बंदची हाक दिली होती.  त्यानुसार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुचाकी वाहनांवरून घोषणा देत  रॅली काढून दरवाढीविरुद्ध बंदचे आवाहन करण्यात आले.  रस्ता अडविल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.  भाजी मंडईत ‘भारत बंद’चा परिणाम दिसून आला. सुमारे साठ टक्के व्यापार बंद होता.  आष्टा शहरात आंदोलनास संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. 

कडेगाव तालुक्यात  आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यात वांगी, नेवरी, चिंचणी, शाळगाव, विहापूर, अमरापूर, नेर्ली, अपशिंगे, मोहित्यांचे वडगाव आदी गावांसह तालुक्यात  दुकाने बंद होती.बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता.   

पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, पलूस, दुधोंडी, किर्लोस्करवाडी येथे बंद पाळण्यात आला. तासगाव शहरासह मणेराजुरी, कुमठे, येळावी, पाचवा मैल परिसरात संमिश्र आंदोलन झाले. खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी बंदमुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. आटपाडीत   बंदला मोठा प्रतिसाद लाभला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एम.पाटील व सहकार्‍यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापार्‍यांना केले होते.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.

कवठेमहांकाळ तालुक्यात ठिकठिकाणी बंद पाळून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. जत तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी बंदचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळाला.