Thu, Jun 27, 2019 18:16होमपेज › Sangli › जत पंचायत बैठकीत काँग्रेस आक्रमक

जत पंचायत बैठकीत काँग्रेस आक्रमक

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 27 2018 12:13AMजत : प्रतिनिधी

शहरातील महामार्गावरील खड्डे, आरोग्य सेवेचा बोजवारा, दाखल्यांसाठी होणारी हेळसांड या विषयावरून जत पंचायत समिती सभेत काँग्रेस सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण रुग्णालय व महसूल विभागाच्या कारभाराचा पंचनामा केला. सभापती मंगल जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. बैठकीस उपसभापती शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी संजय चिल्‍लाळ, सदस्य मनोज जगताप, दिग्वीजय चव्हाण, अ‍ॅड. अडव्याप्पा घेरडे, श्रीदेवी जावीर, अर्चना पाटील, महादेवी तावशी, रवींद्र सावंत आदी उपस्थित होते.

शहरात सोलनकर चौक ते मार्केट यार्ड या दरम्यान महामार्गावर असंख्य खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा विषय दिग्विजय चव्हाण यांनी मांडला. त्याला अन्य सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवानंद बोलीशेट्टी म्हणाले की, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे त्याची दुरूस्ती आम्हास करता येत नाही. मात्र सदस्य अधिकच आक्रमक झाले. महामार्ग  अधिकार्‍यांना पत्र पाठविण्याचा निर्णय झाला.

बसर्गी येथील शेतकर्‍याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा विषय तावशी यांनी मांडला होता. या विषयावरून ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकार्‍यांना सदस्यांनी धारेवर धरले. रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवर बोगस डॉक्टर नेमला असल्याचा विषयही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. चव्हाण, सावंत यांनी कारवाईची मागणी केली.महसूल विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी दाखले वेळेवर मिळत नाहीत. महसूलचे अधिकारी बैठकीस उपस्थित रहात नसल्याचा विषय चव्हाण यांनी मांडला. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार शेट्यापगोळ यांना बोलावून घेण्यात आले. सावंत, अ‍ॅड. घेरडे, श्रीदेवी जावीर यांनी शालेय विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावत शेट्ट्यापगोळ यांनी सर्व सेतू कार्यालयास सक्‍त सूचना दिल्याचे सांगितले.


सदस्या कविता खोत गैरहजर

पंचायत समितीच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त करीत राजीनामा दिलेल्या सदस्या कविता कांताप्पा खोत या सभेस उपस्थित नव्हत्या. त्यांची गैरहजेरी दिवसभर पंचायत समिती परिसरात चर्चेचा विषय बनली होती. राजीनाम्याबाबत सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी गटविकास अधिकार्‍यांना विचारणा केली. मात्र राजीनामा विहित नमुन्यात दिला नसल्याचे सांगून त्यांनी या विषयास बगल दिली.