Fri, Jul 19, 2019 20:42होमपेज › Sangli › तिरंगा यात्रा म्हणजे जनतेची फसवणूक 

तिरंगा यात्रा म्हणजे जनतेची फसवणूक 

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 11:29PMकडेगाव : शहर प्रतिनिधी

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपने काडीमात्र योगदान दिलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर कधीही तिरंगा फडकला नाही. त्यामुळे भाजपने काढलेली तिरंगा यात्रा म्हणजे  देशभक्तीच्या नावाखाली जनतेची केलेली फसवणूक आहे, अशी जोरदार टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

डॉ. कदम पुढे म्हणाले की, देशात संविधान धोक्यात आले आहे. लोकशाही धोक्यात आली असून तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत  संपूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेसने संविधान बचाव देश बचाव रॅली काढली. या रॅलीला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसने काढलेल्या या रॅलीच्या विरोधात म्हणून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काडीमात्र योगदान नसलेल्या  भाजपने  तिरंगा यात्रा काढली, हा हास्यास्पद  प्रकार आहे.

ते म्हणाले, देशात लोकशाही  धोक्यात आली आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या घरामध्ये  महत्वपूर्ण पक्षीय बैठक सुरू असते. त्या ठिकाणीही काही पोलिस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये जातात आणि या बैठकीची माहिती घेतात. हा प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. यावरून देशात लोकशाही बरोबर संविधानही धोक्यात आले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे .

डॉ. कदम म्हणाले, काँग्रेस पक्षाला सव्वाशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. तो सर्वज्ञात आहे. या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले आहे. अनेकांनी  बलिदान दिले आहे. प्रजासत्ताकदिन समारंभात कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुखाला सन्मानाने पहिल्या रांगेत बसण्याची जागा दिली जाते. परंतु भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसण्याची जागा दिली. यातून भाजप किती गलिच्छ व खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहे,  ते स्पष्ट होते.

ते म्हणाले, देशात तणाव वाढला आहे आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा गंभीर परिस्थितीत युवक काँग्रेसने ‘संविधान बचाव देश  बचाव रॅली’ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काढली. या रॅलीला समाजाच्या सर्वथरातून उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला.