Wed, May 22, 2019 11:07होमपेज › Sangli › मुख्यमंत्र्यांना जनतेसमोर येण्यास भीती का वाटते?

मुख्यमंत्र्यांना जनतेसमोर येण्यास भीती का वाटते?

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 30 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेला गेले नाहीत. सांगलीत महापालिका निवडणुकीच्या प्रचारालाही ते येणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना जनतेसमोर येण्यास भीती का वाटत आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार विश्‍वजित कदम, जयश्री पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, अब्दूल सत्तार उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, सांगली महापालिका निवडणुकीचे रणांगण सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रचाराला आले; मात्र भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले नाहीत. ते येणार नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्‍वासन साडेचार वर्षात पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे जनतेला सामोरे जाण्यास त्यांना भिती वाटत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पूजेची परंपरा खंडीत झाली. मराठा, धनगर आरक्षण प्रलंबित राहिले आहे. महागाई वाढली आहे. तरुणांना नोकर्‍या नाहीत. बेरोजगारीत वाढ झाली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे लोकांना ‘फेस’ करायला मुख्यमंत्री घाबरत आहेत.

सत्ताधार्‍यांच्या बेताल व्यक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन भडकले. मराठा आंदोलकांना लाठ्या काठ्यांनी मारले आहे. मराठा आंदोलक गुन्हेगार नाहीत. त्यामुळे आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत. सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीर कार्यपद्धतीचा अवलंब करून मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. त्यासाठी त्यांना काँग्रेसचे पूर्ण सहकार्य मिळेल. धनगर, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्‍नही मार्गी लावावा, असे चव्हाण यांनी सांगितले. 

चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आरक्षणविरोधी आहे. आरएसएसला मराठ्यांना आरक्षण मिळवू द्यायचे नाही. त्यामुळे मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाला विलंब होत आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करते. राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे. शिवाजी महाराज यांना अपेक्षित असलेला राज्यकारभार सुरू आहे का याचे चिंतन शिवसेनेने करावे. निष्ठावंत शिवसैनिक आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास हे सरकार गडगडेल. मुख्यमंत्री बदलाची वेळच येणार नाही. मुख्यमंत्री विशिष्ट एका समाजाचे आहेत म्हणून त्यांना अडचणीत आणले जाते अशी टीका केली जाते. पण ही टीका चुकीची आहे. स्वत: अडचणीत आल्यावर जातीच्या, समाजाच्या आड लपण्याचा हा प्रकार आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.