Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा आज खल

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा आज खल

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 8:19PMसांगली : प्रतिनिधी

माळबंगला येथील 70 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राचे गुरुवारी (दि. 7) उद्घाटन होत आहे. सायंकाळी 5 वाजता होणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण तर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आणि आघाडीच्या चर्चेमुळे या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व आले आहे. अर्थात यामुळे दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत विरोधक म्हणून भाजप टार्गेट असणार, हे उघड आहे. यातून साहजिकच राजकीय टोलेबाजीतून आघाडीचा खल रंगणार हे उघड आहे. 

कृष्णा नदीच्या प्रदूषणावर उपाय म्हणून काँग्रेसनेते (कै.) मदन पाटील यांच्या पुढाकाराने 2006 मध्ये वारणा योजनेला मंजुरी मिळाली. त्याचा मुहूर्तही झाला. नंतर 2008 मध्ये महापालिकेत सत्तांतर होऊन जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सत्तेत आली. त्यावेळी जयंत पाटील यांनी वारणा योजनेला फाटा देऊन कृष्णेतूनच पाणी उचलून ते शुध्द करून देण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत पाणीपुरवठा सक्षमीकरण आणि कुपवाडला पाणीपुरवठ्याची यंत्रणा उभारण्यात आली. याअंतर्गत माळबंगला येथील जुन्या 36 एमएलडी जलशुद्धीकरणाची क्षमता वाढवून अत्याधुनिक 56 एमएलडी क्षमता करण्यात आली. तसेच सांगली व कुपवाडसाठी नव्याने 70 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. शुद्ध पाण्यासाठी अत्याधुनिक अशा अमेरिकन स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उद्घाटनाच्या निमित्ताने काँग्रेसने शक्‍तिप्रदर्शनाचीच तयारी केली आहे.दरम्यान,  एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांत भाजपने मोठी मुसंडी घेतली आहे. आता मिशन महापालिका टार्गेट ठेवून भाजपने पुन्हा जोरदार तयारी सुरू केली आहे.

त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीसाठी यापूर्वीच बोलणी सुरू केली आहे. त्याअंतर्गत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून तसेच स्थानिक पातळीवर तशा चर्चाही सुरू आहेत. शिवाय ही योजना उभारणीसाठी दोन्ही पक्षांचे योगदान आहे. यामुळे दोन्ही पक्षाच्यादृष्टीने हा उद्घाटनाचा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे. दोन्ही शहराला होणार्‍या शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्याबरोबरच आता राजकीय पाणीही रंगणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांची विशेष उपस्थिती असेल. खासदार संजय पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भाजप टार्गेट ठेवून टीकेची झोड उठणार, हे उघड आहे. याचबरोबर दोन्ही प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. त्यानिमित्ताने रंगणारी टोलेबाजी ही आघाडी होणार की नाही, याचेही चित्र स्पष्ट करणारी आहे.

सर्वपक्षीय तोडगा; कार्यक्रम मात्र आघाडीचा

सत्ताधारी काँग्रेसने 70 एमएलडी केंद्राचे उद्घाटन राजकीय श्रेयाचा भाग बनविले होते. पण या प्रकल्पासाठी शासनाचा निधी असल्याने सर्व पक्षीयांना निमंत्रित करावे, असा आग्रह शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी धरला. आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनीही शासकीय प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करून हा कार्यक्रम सर्वपक्षीय झाला पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यासाठी त्यांनी भाजप खासदार, आमदारांचाही पत्रिकेवर समावेश करण्याचा आग्रह धरला. यामुळे राजकीय वाद रंगला होता. सोबतच सांगली जिल्हा सुधार समितीनेही ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते उद्घाटनाचा इशारा दिला होता. सर्वांशी चर्चेने निमंत्रणापुरता हा कार्यक्रम सर्वपक्षीय बनला आहे. प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच निवडणूक एल्गार असणार आहे.

भविष्यात 7 लाख लोकांची पाणीपुरवठ्याची सोय

सांगली व कुपवाडसाठी सध्या 4.15 लाख लोकसंख्येसाठी 68 एमएलडी पाणीपुरवठा मुबलक आहे. भविष्यातील 2043 पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेता अमेरिकन स्काडा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन 70 एमएलडी जलशुद्धिकरण उभारले आहे. त्यासाठी 127.25 कोटी रुपये खर्च झाला आहे. सध्याच्या यंत्रणेतून दोन पंपाद्वारेच पाणीउपसा केला जात आहे. त्यामुळे 70 एमएलडी क्षमतेच्या केंद्रातून सध्या दररोज 38 ते 40 एमएलडीच पाणी शुद्ध केले जाते. दुसर्‍या 56 एमएलडी केंद्रातून 32 एमएलडी पाणी शुध्दिकरण करून पुरवठा होत आहे. भविष्यात पाण्याची गरज पाहून उपसा वाढविला जाईल. त्यासाठी नव्याने जॅकवेलवर 335 एचपीचे दोन पंप बसविले जाणार आहेत. यामुळे 2043 पर्यंत 7 लाख लोकसंख्येला पुरेल इतके सक्षमीकरण असेल.