Mon, May 20, 2019 10:04होमपेज › Sangli › तीन जागांवर अडले काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे घोडे 

तीन जागांवर अडले काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे घोडे 

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:36PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीसाठी जागवाटपाचे गुर्‍हाळ सुरू ठेवले आहे. आघाडीबाबत चर्चेतून एकमत होऊ लागले असले, तरी प्रामुख्याने तीनही शहरात प्रत्येकी एक प्रभागाच्या जागावाटपावर घोडे अडले आहे. यामुळे हा तिढा साहजिकच आघाडीपुढे पेच निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी प्रस्ताव, चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत. दुसरीकडे, 4 जुलैपासून अर्ज भरावयाचा आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे सर्वच प्रभागांत मुलाखतींची प्रक्रिया पार पाडली. यामुळे सर्वच प्रभागांत दोन्हीकडून इच्छुकांच्या याद्या तयार होणार आहेत. परंतु, या जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवार ठरविण्यापूर्वी दोन्हीकडून आघाडीचा सोक्षमोक्ष लागणे गरजेचे आहे. यामध्ये आघाडी करताना प्रभागनिहाय दोन्हीकडून तुल्यबळ उमेदवारांची स्पर्धा होणार आहे. 

दोन्ही पक्षांकडून त्यानुसार विद्यमान सदस्य आणि प्रबळ दावेदार यांचा आढावा घेऊन जागावाटपाचे प्रस्ताव आदान-प्रदान सुरू आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला 78 पैकी 35 जागा देऊ केल्या होत्या. त्यावर काँग्रेसनेही संख्याबळ विचारात घेऊन आघाडीच्या योग्य प्रस्तावाच्या सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीला केवळ 20 जागांचा प्रस्ताव दिला होता. याबाबत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांकडून जागावाटपाबाबत ताताताणी सुरू आहे. 

अखेर दोन्हीकडून विद्यमान सदस्यांच्या जागांसह काही वाढीव जागांबाबत समझोता पुढे येऊ लागला आहे. यामध्ये काँग्रेस 48 राष्ट्रवादी 30 असा सूर काँग्रेसजनांकडून पुढे आला आहे. परंतु काँगे्रसला किमान 35 जागा हव्या आहेत. यामुळे चर्चा सकारात्मकतेच्या दिशेने सुरू असली तरी प्रत्यक्षात काही जागांवर मात्र पेच आहे.प्रभाग 1 मध्ये काँग्रेसचे खुल्या गटातून विद्यमान सदस्य प्रशांत पाटील, उपमहापौर विजय घाडगे आणि  राष्ट्रवादीचे धनपाल खोत यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची ? त्यानुसार ती जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला द्यायची, हा प्रश्‍न आहे. ही जागा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची बनविली आहे. 

प्रभाग 5 मध्येही हाच प्रश्‍न आहे. काँग्रेसकडून तेथे खुल्या गटातून गटनेते किशोर जामदार यांनी त्यांचे पुत्र करण जामदार दावेदार आहेत. हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा दावा आहे. परंतु या प्रभागात खुल्या गटातूनच राष्ट्रवादीकडून माजी महापौर इद्रिस नायकवडी इच्छुक आहेत. त्यामुळे येथेही दोन्ही पक्ष जागा सोडायला तयार नाहीत. सांगलीवाडीत प्रभाग 13 मध्येही असाच पेच आहे. तेथे सध्या काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पाटील खुल्या प्रवर्गातून दावेदार आहेत. परंतु राष्ट्रवादीकडून हरिदास पाटील प्रबळ दावेदार आहेत. एकूणच या तीनही जागा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामध्ये कोण माघार घ्यायची, हा प्रश्‍न आहे. प्रसंगी बंडखोरी  नाहीतर आमने-सामने लढू, असाही सूर पुढे आला आहे. यामुळे या तीन जागांच्या चर्चेतच आघाडीचे घोडे अडले आहे. अर्थात यातून योग्य तोडगा काढताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा कस लागणार आहे. प्रसंगी यातून रस्सीखेचमधून आघाडीच नको, असाही सूर पुढे येऊ लागला आहे.

राष्ट्रवादीकडूनही 300 जण इच्छुक

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी नऊ प्रभागांसाठी 132 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. रविवारी अकरा प्रभागांसाठी 168 इच्छुकांनी मुलाखत दिली आहे. राष्ट्रवादीकडे सर्व 78 जागांवर एकूण 300 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली आहे. अर्थात, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा फैसला काय होतो, यावरच दोन्ही पक्षांच्या अंतिम उमेदवारीचा फैसला होणार आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.