होमपेज › Sangli › मनपाच्या मलिद्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

मनपाच्या मलिद्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 12:14AMसांगली : प्रतिनिधी

शहराचे वाटोळे करीत महापालिकेतील गैरकारभारातून मलिद्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादी निवडणुकीत आघाडी करून एकत्र आले आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ऋषितुल्य पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांनी वसविलेल्या सांगलीचा आधारवड काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराची कीड लावून उद्ध्वस्त केला, असे ते म्हणाले.

महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री सुधीर गाडगीळ,  सुरेश खाडे, सुरेश हाळवणकर, शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, प्रदेश सरचिटणीस  भारती दिगडे, चिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विवेक कांबळे आदि उपस्थित होते.

दानवे म्हणाले, महाराष्ट्राचे लक्ष महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. या जिल्ह्याच्या विकासात वसंतदादांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी अनेक संस्था उभारल्या त्यांच्या पश्चात काय झाले? काँग्रेस आणि त्यानंतर  राष्ट्रवादीने सांगलीला बकाल केले. उलट भाजपने  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार समतोल विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचली आहे. त्याच बळावर आज सांगली जिल्हा भाजपमय झाला आहे. खासदार, आमदार,  जिल्हापरिषद, पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. 

ते म्हणाले, सांगली महापालिका कोणाच्याही ताब्यात गेली तरी  त्यामुळे काय फरक पडणार, असे काहीजण म्हणत आहेत. पण ही महापालिका निवडणूक फार महत्त्वपूर्ण आहे. कारण राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, येथेच कळणार आहे. तेच ठरवण्याची ही वेळ आली आहे. यामुळे एकदा भाजपला सत्ता द्या. भाजपच्या महापौराचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगलीत आणू. सांगलीच्या विकासाचा अजेंडा आणि शासनपातळीवरील निधी त्या सभेतच मंजूर करायला लावू.

ना. पाटील म्हणाले, पक्षातील काहीजणांना संधी मिळालेली नाही. त्यांनी नाराज न होता कामाला लागावे. त्यांची नाराजी नेत्यांवर जरूर असावी, पण त्याचा पक्षावर अन्याय होऊ नये. हीच वेळ आहे. आता ताकद दाखवा, तुमचा सन्मान जरूर होईल.ना. देशमुख म्हणाले, म्हणाले,सत्तेतून पैसा आणि पैशातून गुंडगिरी नको आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यत विकासाची गंगा गेली पाहिजे, यासाठी  पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस  24 तास काम करीत आहेत. प्रत्येकाला हक्काचे घरकुल, विमा आदी सुविधा देत आहेत. पण महापालिकेची सत्ता जर चुकीच्या हाती असेल तर या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत मिळणार नाही. ते म्हणाले, देशात भाजप हा  नंबर एकचा पक्ष आहे. सांगली महापालिका ज्यांच्या अनेक वर्षे ताब्यात होती त्यांना 78 उमेदवारही उभे करता  आले नाहीत. आम्ही कमळ चिन्हावर 78 उमेदवार उभे केले आहेत.या शहराच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी आणू शकतो, हा जनतेला विश्वास आहे.

खासदार संजय पाटील म्हणाले,  महापालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. काही लोकांची पालिकेत मक्तेदारी झाली आहे. ती मोडून काढण्यासाठी आता भाजपला संधी द्या. भाजपचे माजी शहराध्यक्ष शेखर इनामदार बोलताना  भावनाविवश झाले. पाणवलेल्या डोळ्यांनी ‘या निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांची हात जोडून जाहीर माफी मागतो’ असे  त्यांनी आवाहन केले. 

काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांना पराभूत केले होते...!

रावसाहेब दानवे म्हणाले, भाजपला जातीयवादी म्हणून टीका करणार्‍या काँग्रेसचा वारसा जनता विसरलेली नाही. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडारा आणि दादर येथून दोनवेळा लोकसभा निवडणुका लढविल्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उभे केले. त्यांना पराभूत करण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रचारात उतरले होते. उलट भाजपमध्ये दलित आमदार, खासदार सर्वाधिक संख्येने आहेत. सर्वसमावेशक सर्वांचा विकास हाच भाजपचा अजेंडा आहे.