Wed, May 22, 2019 14:56होमपेज › Sangli › काँगेस-राष्ट्रवादी आघाडीचा रविवारी प्रचारप्रारंभ

काँगेस-राष्ट्रवादी आघाडीचा रविवारी प्रचारप्रारंभ

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 10:02PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू झाला आहे. याअंतर्गत रविवारी (दि. 22) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. भाजपकडूनही भागनिहाय प्रचार सुरू असला तरी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांच्या सभांचा झंझावात होणार आहे. एकूणच यानिमित्ताने राजकीय रणांगण आता चांगलेच तापले आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडीसह अपक्षांची महाआघाडी रिंगणात उतरली आहे. एकूण 20 प्रभागांतील 78 भावी नगरसेवकांसाठी सुमारे 451 हून अधिक सर्वपक्षीय उमेदवार रिंगणात आहेत. त्यानुसार सर्वांकडून प्रभागनिहाय प्रचारही सुरू आहे. तरीही वातावरण तापविण्यासाठी आता सर्वांकडून प्रचाराच्या प्रारंभाच्या निमित्ताने राज्यस्तरीय, राष्ट्रीय नेते सांगलीत येऊन तोफा डागणार आहेत.

आघाडीच्या प्रचाराची सुरुवात रविवारी (दि. 22) रोजी सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये स्वतंत्रपणे होणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पटील, माज मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम आदी उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. त्यानिमित्ताने तीनही शहरांमध्ये स्वतंत्र सभा होणार आहेत. 

ते म्हणाले, आघाडीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रवक्‍ते भाई जगताप, आमदार प्रणिती शिंदे आदींसह अनेकजण प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. भाजपकडून दि.27 व 28 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचे  सांगली, मिरजेत  नियोजन करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह अनेक नेते प्रचारात   आघाडीवर आहेत.