Sun, Jun 16, 2019 02:17होमपेज › Sangli › काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत अडथळे!

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत अडथळे!

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 8:00PMसांगली : सुनील कदम

महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून खलबते सुरू असली तरी स्थानिक पातळीवरील हालचाली विचारात घेता अशी आघाडी होण्याची शक्यता धुसर बनत चाललेली आहे. दोन्ही काँग्रेसमधील बहुसंख्य इच्छुकांचा आणि पक्षातील काही मातब्बरांचा  स्वतंत्र लढण्यासाठी आग्रह आणि दबाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि प्रामुख्याने भाजपला रोखण्यासाठी ‘मैत्रीपूर्ण’ लढतीच्या दिशेने चाचपणी सुरू केल्याचे दिसत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत. दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी जवळपास तीनशे इच्छुक उमेदवार आहेत. त्यापैकी काही हवशे, गवशे, नवशे आणि प्रामुख्याने ‘इलेक्टीव्ह मेरीट’ नसलेले इच्छुक सोडले तरी दोन्ही पक्षांकडे किमान साठ ते सत्तर तगड्या उमेदवारांची यादी तयार आहे. यामध्ये अर्थातच दोन्ही बाजूंच्या विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे. आघाडी झाली तर किमान पन्नास जागा आपल्या वाट्याला आल्या पाहिजेत, असा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे, तर चाळीसहून अधिक जागांची राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मागणी आहे. याबाबतीत स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर चर्चेच्या तीन-चार फेर्‍या होऊनसुध्दा दोन्ही बाजू  आपापल्या मागण्यांवर ठाम असल्याने अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

सद्यस्थितीत  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आणि संभाव्य किंवा इच्छुकांना वेगवेगळी  भीती आहे. दोन्ही काँग्रेसकडे किमान साठ-सत्तर तगड्या आणि प्रामुख्याने इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या इच्छुक उमेदवारांची यादीच तयार आहे. जर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर आघाडी धर्मानुसार दोन्हीकडच्या किमान निम्म्या लोकांना आपल्या महत्वाकांक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. आघाडीमुळे उमेदवारी डावलली गेली तरी नेत्यांचा आदेश किंवा शब्दाखातर इच्छुक उमेदवार गप्प बसतील, याची कोणतीही खात्री दोन्ही पक्षाच्या नेतेमंडळींना किमान आज तरी देता येत नाही.  अशी नाराज मंडळी आपसूकच भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तसे झाले तर मात्र दोन्ही काँग्रेसमधील या नाराजांच्या खाद्यावर बंदूक ठेवून भाजपचे नेते दोन्ही काँग्रेसचा पराभूत  करायला सज्ज होणार आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना हे होऊ द्यायचे नाही. त्यामुळे संभाव्य बंडखोरी टाळून  जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आणि प्रामुख्याने भाजपला महापालिकेतील सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा आटापिटा सुरू आहे.

दोन्ही काँग्रेसकडील इच्छुक उमेदवारांची वेगळीच भीती आहे. जर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर दोन्ही पक्षांच्या वाट्याला निम्म्याच जागा येणार आणि या निम्म्या जागेत पुन्हा आपला पत्ता कट होणार, का  याची अनेकांना धास्ती आहे. दोन्ही काँग्रेसकडे जे इच्छुक आहेत, त्यामध्ये विद्यमान नगरसेवकांसह पहिल्या - दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते असलेल्या प्रत्येकी किमान साठ-सत्तर तगड्या उमेदवारांचा समावेश आहे. बहुसंख्य मंडळींनी  चार-पाच वर्षांपासूनच आपापल्या प्रभागांची ‘राजकीय मशागत’ करून ठेवली आहे.  त्यामुळे आपण मशागत केलेल्या रानात ऐन हंगामात भलत्यानेच येऊन पेरणी करावी, हे या मंडळींना मानवणारे नाही. त्यामुळे भलेही आघाही मोडली तरी चालेल, किंबहुना आघाडी न झाली तर अधिक उत्तम, पण आपणालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा या मंडळींनी आपापल्या नेत्यांच्या कानीकपाळी ओरडून आग्रह धरला आहे. तसेच पक्षाने ‘न्याय’ न दिल्यास अन्य पक्षात किंवा प्रामुख्याने भाजपमध्ये जावून बंडाचा झेंडा फडकविण्याची सिध्दता यापैकी अनेकांनी केल्याचे दिसत आहे.

भाजपला करावी लागणार नवी व्यूहरचना!

महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत भाजपची ताकद किती आहे ती सगळ्यांनाच ठाऊक आहे. पक्षाच्या नेत्यांनाही याची जाणीव आहे. त्यामुळे किमान आज घडीला तरी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची सगळी मदार काँग्रेस-राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरांवर अवलंबून आहे. कधी एकदा या आघाडीचा निर्णय लागतो आणि या दोन पक्षातील कोण कोण आपल्या गळाला लागतात, याकडे त्यांचे लक्ष आहे. आघाडी झालीच नाही आणि दोन्ही पक्षांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव स्वीकारला तर भाजपला व्यूहरचनाच बदलावी लागेल. ज्यांच्या गळ्यात गळे घालण्याची सिध्दता चालवली होती, त्यांच्याशीच दोन हात करावे लागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

‘मैत्रीपूर्ण लढतीचा’ प्रस्ताव चर्चेत

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील आघाडीसाठीच्या चर्चेदरम्यान ‘मैत्रीपूर्ण लढतीचा’ प्रस्ताव चर्चेत येण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या आणि ऐन निवडणुकीत परस्परांच्या ‘इलेक्टीव्ह मेरीट’च्या उमेदवारांना एकमेकांकडून आवश्यक ती ‘ढील’ द्यायची. निवडणुकीनंतर एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करायची, असा हा फॉर्म्युला असल्याचे समजते. दोन्ही पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी आणि प्रामुख्याने या सगळ्यावर डोळा ठेवून असलेल्या भाजपला महापालिकेतील सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत अखेरच्या क्षणी या मैत्रीपूर्ण लढतीवर खल होण्याची चिन्हे आहेत.

इकडे आड, तिकडे विहीर....

आघाडी करावी तर ‘आड’ आणि आघाडी न करावी तर ‘विहीर’, अशी दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची अवस्था झाली आहे. आघाडी झाली तर आपापल्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी, असे त्यांचे प्रयत्न आहेत, तर भलेही आघाडी नाही झाली तरी चालेल, पण आम्हाला संधी मिळालीच पाहिजे, असा बहुसंख्य इच्छुक उमेदवारांचा आग्रह असल्याचे चित्र आहे.