Mon, Jun 17, 2019 14:33होमपेज › Sangli › ‘शत-प्रतिशत’ आघाडीसाठी घरवापसी अन् संघर्षाला विराम 

‘शत-प्रतिशत’ आघाडीसाठी घरवापसी अन् संघर्षाला विराम 

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 11 2018 11:18PMसांगली : मोहन यादव 

भाजपचा जिल्ह्यातील विजयाचा अश्‍वमेध रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेल्यांची ‘घरवापसी’ करण्याबरोबर भाजपमध्ये जाणार्‍या नाराजांना मोठी संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लोकसभा व विधानसभेच्या जागांची अदलाबदल करण्याची तयारी चालविली आहे. 

सांगली जिल्हा कोणत्याही परिस्थितीत हा आघाडीचा बालेकिल्ला. तो अबाधित राहिला पाहिजे,  अशा सक्त सूचना जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेस नेत्यांना हायकंमाडने दिल्या आहेत.  त्यानुसार   जिल्ह्यातील नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढून कार्यकर्त्यांना रिचार्ज केले आहे. युवा नेते आ. विश्‍वजित कदम, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, सत्यजीत देशमुख यांनी सुत्रे हातात घेतली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष बांधणीत अतिशय गांभिर्याने लक्ष घातले आहे.   

दोन्ही पक्षांनी नव-नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याची सुरवात लोकसभेच्या जागेपासून सुरू केली आहे. विट्याचे माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील भाजपमध्ये उडी मारण्याच्या तयारीत आहेत. त्यांना  भाजपमध्ये जाण्याचे थांबवून आघाडीतर्फे लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा  सुरू आहे. येथील शिवसेनेचे  आमदार व पूर्वीचे राष्ट्रवादीचे  नेते असलेले अनिल बाबर हे फारसे समाधानी नसल्याने त्यांची ‘घरवापसी’ करण्याची तयारी सुरू आहे. शिराळ्यातील भाजपमध्ये आ. शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद न दिल्याने ते नाराज आहेत. खा. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव नाईक यांच्याशी जुळवून  घेणे सुरू केले आहे. काँग्रेसचे सत्यजीत  देशमुखही त्यांच्या विरोधात आहेत. पण खा. शेट्टी यांचे नाईक यांच्याशीही चांगले जमते. अलिकडे शेट्टी  यांनी  काँग्रेसशी जमवून घेणे सुरू केले आहे. त्यामुळे नाईक हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या मनस्थितीत आहेत. वरिष्ठ नेत्यांकडूनही तसे प्रयत्न सुरू आहेत. मानसिंगराव यांना विधानपरिषदेत संधी देण्यास राष्ट्रवादीची तयार आहे. 

जतमधील जागा काँग्रेसला देऊन मिरजेतील उमेदवारी राष्ट्रवादीकडे देण्याचे समीकरणही पुढे येत आहे. जतमध्ये  काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. मिरजेत मुस्लिम समाजात राष्ट्रवादीची ताकद बर्‍यापैकी आहे. ग्रामीण भागातही दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी आहेत. त्यामुळे येथेे राष्ट्रवादीने नवा  व सक्षम चेहरा देण्याची   तयारी चालविली आहे. 

सांगलीची जागा काँग्रेसकडे असेल. पण   येथे तिकीट कोणाला द्यायचे याचा मोठा पेच आहे. मदन पाटील समर्थक जयश्री पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत. तर तसेच विशाल पाटील यांचे  नाव आघाडीवर  आहे.  शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही  इच्छुक आहेत. त्यामुळे तिकिटासाठी मोठी रस्सीखेच राहणार आहे. 

ही समीकरणे जुळून आल्यास वाळवा, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ या  विद्यमान जागांबरोबर शिराळा, खानापूर-आटपाडी, जत, मिरज, सांगली याठिकाणी आघाडीचे आठही आमदार निवडून येऊ शकतात.  तसेच  खासदारकीही पदरात  पडू  शकते. हे समीकरण जुळले नाही; तर मग मात्र पुन्हा काही  वर्षे सत्ता येणे मुश्कील आहे, याची जाणीव ‘बारामती’ व ‘हायकंमाड’ने करून दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते ही  जुळवाजुळव  करण्यासाठी  कामाला लागले आहेत.