होमपेज › Sangli › काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्व:बळाचाच नारा

काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्व:बळाचाच नारा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : अमृत चौगुले

आघाडीच्या घोषणा होता होता काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा सुरू केला आहे. यामागे सत्तेसाठी पूर्ण तयारीने मैदानात उतरणार्‍या  भाजपच्या ‘इनकमिंग’ ला ब्रेक लावणे हे कारण असल्याची चर्चा आहे. यातून काँग्रेस व राष्ट्रवादीतील विद्यमान सदस्य तसेच इच्छुक कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळतील.  सोबतच एकमेकांवरचे जबाबदारीचे ओझे टाळण्यासाठी कार्यकर्त्यांसह इच्छुकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याची चर्चा आहे.  याद्वारे भाजपची कोंडी करून निवडणुकीनंतर आघाडी करून सत्तेची मोट बांधता येईल, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीतून निघत आहे.

भाजपचा वारू रोखण्यासाठी राज्य पातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सरकारविरोधी संघर्षयात्रा काढल्या. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत वेगवेगळे लढल्याने दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. भाजपला संधी मिळाली, अशा नेत्यांसह कायकर्त्यांनीही भावना व्यक्‍त केल्या. त्यामुळे यापुढे स्थानिक निवडणुकाही आघाडीतूनच लढू, अशाही घोषणा काँग्रेसनेते कै. डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केल्या होत्या.पण आता प्रत्यक्ष महापालिका निवडणुकीसाठी मात्र कार्यकर्ते आणि नेत्यांचा सूर काही जुळत नाही.  डॉ.  कदम यांच्या निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी थोपविण्यासोबतच महापालिकेतील सत्ता टिकविण्याचे काँग्रेससमोर  आव्हान आहे. 

वास्तविक चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे सध्याचे प्रभाग तब्बल 25 हजारपेक्षा अधिक मतदारसंख्येचे  झाले आहेत. त्यामुळे तेवढे ताकदीचे उमेदवार उभे करताना सर्वच पक्षांसमोर आव्हान आहे. 
तरीही इच्छुकांची मात्र मोठी रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात सर्वाधिक इच्छुक हे काँग्रेसकडे आहेत. त्यापैकी बहुसंख्य इच्छुक प्रबळही आहेत. पण तेच ते चेहरे आणि त्यांना आरक्षित प्रभाग असताना खुल्या प्रभागांतून संधी देताना आमच्यावर अन्याय का? असा सूर नव्या इच्छुकांतून सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी केली तर विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच इच्छुकांना संधी देण्यास अनेक अडचणी येणार आहेत.

सध्या तरी काँग्रेसची निवडणूक नियोजन आणि प्रचाराची सूत्रे ही प्रामुख्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवा नेते विशाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याकडे राहणार आहेत. परंतु मोहनराव कदम यांनी विधानपरिषद निवडणुकीचा अनुभव पाहता  राष्ट्रवादीची हातमिळवणी नको असा पवित्रा घेत स्वबळाचा आग्रह धरला आहे. काँग्रेसची ताकद मोठी असल्याने स्वबळावरच लढत होऊ द्या, असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही सूर  आहे. 

इकडे राष्ट्रवादीतूनही तसाच सूर आहे. वास्तविक गेल्या अनेक निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी अशाच पारंपरिक प्रभागनिहाय लढती होत आल्या आहेत. त्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या गेल्या होत्या. गेल्या पाच वर्षांतही सत्तारुढ काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी कधी आक्रमक, तर कधी सोयीस्कर भूमिका घेत आहे. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ही संधी टिपण्यासाठी नगरसेवक आणि कार्यकर्ते विरोधकच म्हणून आमने-सामने येण्यासाठी सज्ज आहेत. असे असताना झाले गेले विसरून दोन्ही पक्षांनी हातात हात घालून एकत्र कसे यायचे असा सवाल विचारला जात आहे. 20 प्रभागात 78 जागांसाठी दोन्ही पक्षात हजारो कार्यकर्ते इच्छुक आहेत. कुणासाठी कुणी थांबायला किंवा माघार घ्यायला तयार नाही. त्यात आघाडी झाली तर आणखी गोंधळ उडेल.  त्यातून  फुटाफूट, गटबाजीचा धोका आहे.

एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचालींवर भाजप आणि शहर विकास आघाडीसह अन्य पक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विशेषतः भाजप यावेळी सर्व सामर्थ्यानिशी निवडणूक रिंगणात उतरणार, हे स्पष्ट आहे. अर्थात त्यांचा शहरात पाय तेवढा पूर्ण ताकदीने रोवला गेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणे याही निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीत फोडाफोडी करुन इनकमिंगद्वारे सत्ता मिळवण्याचा ते जोरदार प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी त्यांनी अनेकजणांना  आमिषाद्वारे गळही टाकला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची  आघाडी झाल्यास दोन्हीकडील प्रबळ इच्छुक उमेदवारीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. साहजिकच अशा प्रबळ इच्छुकांना  भाजपमधून संधी देत जाळ्यात ओढण्यासाठी भाजपनेत्यांनीही सापळा लावला आहे. हा धोका टाळण्यासाठी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर सर्व प्रबळ इच्छुकांना संधी मिळेल, अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आशा वाटते. प्रसंगी त्यातून  पारंपरिक लढती रंगतील, जे निवडून येतील ते आपलेच.निवडून आल्यानंतर सत्तेसाठी नंतर आघाडी करून 60 पर्यंत आकडा पोहोचवता येईल, असाही विचार आहे. त्यादृष्टीनेच आता  दोन्हीकडून स्वबळाचा नारा सुरू आहे.

Tags : Sangli, Sangli News, Congress, NCP, slogan, Self strength, municipal, elections


  •