होमपेज › Sangli › मृत्यूची बातमी...आणि अवघा जिल्हा हळहळला

मृत्यूची बातमी...आणि अवघा जिल्हा हळहळला

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 2:07AMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्ह्याचे नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांची अकाली  एक्झिट मनाला चटका लावणारी आहे.  त्यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्याचे पालकत्व हरपले आहे. कडेगाव-पलूस मतदारसंघ व जिल्हा पोरका झाला आहे. जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणारा नेता हरपला आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांना जिल्हातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातून श्रध्दांजली वाहण्यात आली. 

अजातशत्रू मार्गदर्शकाला मुकलो :  आमदार जयंत पाटील
सोनसळसारख्या खेड्यातून डॉ. पतंगराव कदम यांच्यासारख्या वादळाने शुन्यातून स्वत:चे विश्‍व निर्माण केले होते. त्यांनी भारती विद्यापीठासारखे देशातील उत्तम विद्यापीठ निर्माण केले. त्यांनी राजकारणातही संघर्षातून स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले. काँग्रेसमध्ये राज्यात आणि देशातही त्यांचा दबदबा होता.  पंधरा वर्षे मंत्रिमंडळात सगळ्यांशी खेळीमेळीने राहून भागाचे काम कसे करायचे हे त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो. दुष्काळी भागासाठी कणव ठेवून जलसिंचन योजनांना गती देण्याचे काम त्यांनी केले. अजातशत्रू, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असे महान नेतृत्व होते.त्यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्याची, काँग्रेसची मोठी हानी झाली. माझेही मोठे नुकसान झाले आहे.

जाणत्या राजाला मुकलो : खासदार संजय पाटील
डॉ. कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासातील आघाडीच्या एका जाणत्या राजाला आपण मुकलो आहोत. विकासात्मक राजकारणाचे धडे मी त्यांच्याकडूनच घेतले होते. जिल्ह्याच्या विकासाचा इतिहास त्यांच्या सहभागाशिवाय अपूर्णच आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांना शिक्षणाची कवाडेच खुली केली. एका जाणकार आणि अभ्यासू नेत्याच्या जाण्याने कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

दिलदार महान नेत्याला महाराष्ट्र मुकला : आमदार सुधीर गाडगीळ
डॉ. पतंगराव कदम यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणातील  दिलदार महान नेता हरपला आहे. सोनसळसारख्या ग्रामीण भागातून त्यांनी भारती विद्यापीठ आणि एकूणच राजकारणात घेतलेली भरारी एक स्वप्नवतच आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासात त्यांनी अतुलनीय काम केले आहे. वन अकादमी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासनाच्या इमारतीसह जिल्हा न्यायालय इमारत उभारणीतही त्यांनी मोठे काम केले होते. महाराष्ट्राच्या विकासातही त्यांचा मोठा वाटा होता. अशा नेत्याच्या जाण्याने जिल्ह्याच्या विकासात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

पितृतुल्य आधार हरपला : माजी मंत्री प्रतीक पाटील
काँग्रेसच्या फुटीनंतर डॉ.कदम आणि (कै.) प्रकाशबापू पाटील यांनी जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले होते. डॉ. कदम हे काँग्रेसचे आधारवडच होते. (कै. )प्रकाशबापू यांच्या पश्‍चात पहिल्यांदा लोकसभा उमेदवारीचा विषय आला तेव्हा त्यांनीच मला संधी व पाठबळ दिले.  त्यांच्याकडे आम्ही हक्काने जाऊन भांडत होतो.  डॉ. कदम यांच्या जाण्याने पितृतुल्य आधारच हरपला आहे. 

काँग्रेसचे पितामह हरपले : काँग्रेसनेत्या जयश्री पाटील
डॉ.  कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासातील आघाडीचे नेतृत्व हरवले आहे. काँग्रेसचे पितामहच हरपले आहेत. सांगली जिल्हाच नव्हे तर तमाम महाराष्ट्राचे ते साहेब होते. सडेतोड आणि स्पष्टवक्ते त्यांचा साहजिकच सर्वांना धाक असे. सोनसळ ते सांगली जिल्हा आणि राज्याच्या विकासातील ते सुवर्णपानच होते. त्यांच्या जाण्याने विकासयुगाचा अस्त झाला आहे.  

वडिलधार्‍या नेतृत्वाला मुकलो : खासदार राजू शेट्टी
सांगली जिल्हा एका ज्येष्ठ व वडीलधार्‍या नेत्याला मुकला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने सांगली जिल्ह्यासह राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे होते. त्यांच्या नेतृत्वाची काँग्रेसला व जिल्ह्याला आता खरीच गरज होती. त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

जिल्ह्याचे मोठे नुकसान : पृथ्वीराज देशमुख     
डॉ. कदम  यांच्या जाण्यामुळे जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा व आमचा मोठा राजकीय संघर्ष होता. पण त्यांनी तो विकास कामात कधीच आणू दिला नाही. जिल्ह्याचे व मतदार संघाचे प्रश्‍न आम्ही एकत्र बसून समन्वयाने सोडविले. भाजपतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो.

लाखांचा पोशिंदा गेला : आमदार अनिलराव बाबर
राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या आज सांगली जिल्हा पोरका झाला.   सांगली जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. आमच्या जुन्या खानापूर तालुक्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. आमचे आणि त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने आमचे व्यक्तिगत, तालुक्याचे आणि एकूणच राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. या लाखाचा पोशिंदा असणार्‍या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. 

निर्मळ मनाचा माणूस : आ. विलासराव जगताप
डॉ. कदम ही मोठी व्यक्ती होती. सोनसळसारख्या खेडेगावातून पुढे येऊन भारती विद्यापीठाच्या माध्यमातून राज्याला दिशा देणारे त्यांचे नेतृत्त्व होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य हे महाराष्ट्रावर उपकारच आहेत. त्यांचे मन निर्मळ होते. पोटात एक आणि ओठात एक असे कधीही नसायचे. जे आहे, ते स्पष्टपणे बोलायचे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन जिल्ह्याच्या विकासाचा विचार ते करीत होते. त्यांच्या जाण्यामुळे जिल्ह्याचे तसेच काँग्रेस पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले अहे. 

महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान : आमदार शिवाजीराव नाईक
जिल्ह्याचे सुपुत्र व काँग्रेस पक्षाचे कर्तबगार नेते डॉ. पतंगराव कदम गेल्याने आम्हाला दु:ख झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले. पुण्यासारख्या शहरात भारती विद्यापीठ निर्माण करणे हे त्यांचे कर्तृत्व शब्दात वर्णन न करता येण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात धडाडीने निर्णय घेणारे आणि स्पष्टपणे बोलणारे तसेच सर्वांना बरोबरीने घेऊन जाणारे नेते होते. सांगली जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.  घरातील वडीलधारी नेता निघून गेल्यासारखे वाटते आहे. 

 डॉ. कदम यांचे कर्तृत्व तरुणांना स्फूर्ती देणारे : सत्यजित देशमुख
 डॉ. कदम यांनी शुन्यातून शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली गरूडभरारी ही तरुणांना प्रोत्साहन देणारी ठरलेली आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी फार मोठे काम केले. राज्याचे मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करीत असताना त्यांनी अनेक क्षेत्रात विकास केला. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या व  राज्याच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

 महान नेता हरपला : विशाल पाटील
 डॉ. कदम विकासात्मक राजकारणाला प्राधान्य देणारे  नेते होते. काँग्रेसचा ते आधारवडच होत. महाराष्ट्र आपले कार्यक्षेत्र समजून ते झपाटून काम करीत होते. राजकारणापेक्षा समाजकारण हाच त्यांचा पिंड होता. काँग्रेसचे आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. आज हा आधारवड कोसळला आहे. काँग्रेस आणि आम्ही पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे..

काँग्रेसचा ध्रुवताराच निखळला : पृथ्वीराज पाटील 
साहेबांच्या जाण्याने आमचा आधारवडच कोसळला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील दाताच लोप पावला आहे. राज्याचे आणि जिल्ह्याचे काँग्रेसचे नेतृत्व हरपले आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात नंदनवन फुलविण्याचे काम त्यांनी केले होते. मंत्रीपद असो वा नसो त्यांनी सांगलीचे पालकत्व कायमच स्वीकारले होते. आज त्यांच्या जाण्याने हे छत्रच हरपले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचा ध्रुवताराच निखळला आहे. जिल्हा पोरका झाला आहे. 

जिल्ह्याचे फार मोठे नुकसान : आण्णासाहेब कोरे
 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पक्षाचे मार्गदर्शक पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. 

निरपेक्ष नेता गेला : बाळासाहेब गुरव 
सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांला बळ देणारा, गरीबीची जाण असलेला आणि मदतीसाठी कायम तत्पर असलेला नेता गेला. त्यांनी दुष्काळी भागातील कार्यकर्त्यांना कायम मदत केली. संस्था वाढल्या पाहिजेत. पक्ष वाढला पाहिजे त्याहीपेक्षा सामान्य माणूस जगला पाहिजे यासाठी  ते काम करीत राहिले. 

गरिबांचा सच्चा वाली हरपला :  उमाजीराव सनमडीकर 
गोरगरीबांचा सच्चा वाली हरपला आहे.  ते  जत तालुक्याचे केवळ जावईच नव्हते; तर तालुक्याचे पालकही होते. तालुक्याच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे.जत  तालुक्याला कृष्णा नदीचे पाणी देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते शिक्षणमंत्री, महसूलमंत्री असताना  तालुक्याची असंख्य कामे मार्गी लावली. फार मोठा निधी तालुक्यासाठी दिला. तालुका त्यांचा सदैव ऋणी राहील.

दिलदार, धडाडीचा नेता : सुरेश शिंदे 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून भारती विद्यापीठासारखे विश्‍वविद्यालय उभारणारे डॉ. कदम हे एक अत्यंत धाडसी व दिलदार नेते होते. सर्वसामान्यांच्या मुलांना त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या निधनामुळे जत तालुक्याची सर्वात मोठी हानी झाली आहे.