Thu, Apr 25, 2019 18:04होमपेज › Sangli › जनसंघर्ष यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्ते रिचार्ज

जनसंघर्ष यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्ते रिचार्ज

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 11:18PMकडेगाव : रजाअली पिरजादे 

भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात काँग्रेसच्या  जनसंघर्ष यात्रेला पलूस-कडेगाव मतदार संघातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे  काँग्रेस कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.विश्वजित कदम यांचे संघटन कौशल्यही दिसून आले.

माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांचे आकस्मिक निधन झाले.त्यानंतर झालेला पक्षाचा हा पहिलाच कार्यक्रम होता.  दोन माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री आणि दिग्गज नेते या सभेसाठी उपस्थित होते.त्यामुळे या सभेकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष होते.परंतु आमदार डॉ. कदम आणि कदम कुटुंबियांनी अत्यंत नियोजनबद्धपणे ही संघर्ष यात्रा  यशस्वी करून दाखवली. मोठ्या प्रमाणात लोकांचीही साथ मिळाली.कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह दिसून येत होता.

हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते कडेगावात एकवटले होते.त्यामध्ये विशेषतः युवक आणि  महिलांचा मोठा सहभाग होता. युवकांच्या मोटार सायकल रॅलीने सर्वाना आकर्षित केले. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी अत्यंत आक्रमक भाषण केले. भाजपचे सरकार राज्यात धार्मिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तरुणांना नोकर्‍या देण्याऐवजी त्यांच्या हातात बंदुका दिल्या जात आहेत.भीमाकोरेगाव दंगल सरकारनेच घडवून आणली आहे, असा आरोप त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजप सरकारच्या साडेचार वर्षांतील अपयशाचा पाढा वाचला. केंद्र व राज्य सरकारने खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक केली आहे. सर्वसामान्यांचे हाल होत आहेत असे ते म्हणाले.  स्व.डॉ.पतंगराव कदम यांनी या भागाचा कायापालट केला. त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे काम डॉ.विश्वजित कदम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

जनसंघर्ष यात्रेत  डॉ. कदम यांचे भाषण अत्यंत प्रभावी झाले. भाजप सरकार लोकहिताविरोधी कामे करीत आहे. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत, असे विवेचन त्यांनी केले. त्याचवेळी  स्व.डॉ.कदम यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करून जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासात भर घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. विश्वजित कदम यांच्या कार्याचे कौतुक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. आगामी निवडणुकात डॉ. कदमच उमेदवार त्यांनी जाहीर केले. यावेळी  उपस्थित जनसमुदायाने ‘ विश्वजित कदम तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणा परिसर देत परिसर दुमदुमून टाकला.