Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Sangli › ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस-भाजप बरोबरीत

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस-भाजप बरोबरीत

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 8:34PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 71 सार्वत्रिक  ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 21 गावात सत्ता मिळाली. राष्ट्रवादीला शिराळा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 14 ठिकाणी सत्ता मिळाली आहे. आटपाडी तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला असून शिवसेने शिरकाव केला आहे.  कवठेमहांकाळ तालुक्यात घोरपडे गटाची चार गावात सत्ता आली आहे. 

शिराळा तालुक्यात सर्वाधिक 25 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसने सर्वाधिक 10 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली. या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी बाजी मारली. त्याशिवाय जतमध्ये तीन आणि पलूस तालुक्यात दोन ठिकाणी सत्ता मिळाली. या निवडणुकीत आमदार विलासराव जगताप यांना जोरदार धक्का देत त्यांच्या गावात काँग्रेस नेते विक्रम सावंत यांच्या गटाची सत्ता आली आहे. खानापूर, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी एक जागा मिळाली. भाजपची शिराळा तालुक्यात सहा गावात सत्ता आली. आमदार शिवाजीराव नाईक गटाला हे  यश मिळाले. 

आटपाडी तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी सहा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला. विभुतवाडीत भाजप-सेनेच्या संयुक्त आघाडीने सत्ता मिळविली. आटपाडीत नगरपरिषदेसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सुद्धा सरपंचपदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेने भाजप विरोधात दणदणीत मात करत सरपंचपद मिळवले. कवठेमहांकाळमध्ये भाजपला चार जागा मिळाल्या असून   खासदार संजय पाटील गटाने शिरकाव केला आहे. राष्ट्रवादीला शिराळा तालुक्यात आठ ठिकाणी सत्ता मिळाली. कवठेमहांकाळ तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला आमदार सुमन पाटील आणि महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखालील  गटाला  राष्ट्रवादीला 6 ठिकाणी सत्ता मिळाली. माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला 4 ठिकाणी सत्ता मिळाली. मनसेेला शिराळा तालुक्यात एका गावात सत्ता मिळाली.