Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Sangli › काँग्रेसचे ‘संविधान बचाव’ : भाजपची ‘तिरंगा रॅली’

काँग्रेसचे ‘संविधान बचाव’ : भाजपची ‘तिरंगा रॅली’

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 10:01PMसांगली : प्रतिनिधी

देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत काँग्रेसने ‘संविधान बचाव, लोकशाही बचाव’ रॅली काढली. तर भाजपने तिरंगा एकता रॅली काढली. या दोन्ही रॅलींना चांगला प्रतिसाद मिळाला. सांगलीत शास्त्री चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून  काँग्रेसच्या ‘संविधान बचाव, लोकशाही बचाव’ रॅलीस सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कापडपेठमार्गे स्टेशन चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (शहर) पृथ्वीराज पाटील, महापौर हारूण शिकलगार, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील,  प्रदेश चिटणीस प्रकाश सातपुते, युवक नेते सत्यजित देशमुख, जितेंद्र पाटील, नामदेवराव मोहिते, नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, शैलजा पाटील, जयश्री पाटील, मालन मोहिते, वहिदा नायकवडी, सुवर्णा पाटील तसेच बाळासाहेब गुरव, राजन पिराळे, बिपीन कदम, रवी खराडे, अल्ताफ पेंढारी, सनी धोत्रे, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सुरेश दुधगावकर, उत्तम कांबळे, प्रा. रवी ढाले, किरणराज कांबळे, नितीन कांबळे व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होते. 

पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशातील हुकुमशाही सरकार,  घटना बदलण्याबाबत मंत्र्यांकडूनच होत असलेली वक्तव्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती पाहता राज्यघटनेत मूलभूत बदलाचे संकेत मिळत आहेत. देशाच्या लोकशाहीला,  संविधानला भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून धोका आहे. जनतेने सावध होऊन तीव्र विरोधास सज्ज झाले पाहिजे. 

पालकमंत्री देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ‘तिरंगा एकता’ रॅली

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ‘तिरंगा एकता’ रॅली काढली. आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, मकरंद देशपांडे, मुन्ना कुरणे, शरद नलवडे, सुब्राव मद्रासी, संजय कुलकर्णी, धनेश कातगडे व युवक मोठ्या संख्येने मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते.  

सांगलीत विश्रामबाग येथे आमदार गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयापासून तिरंगा एकता रॅलीस सुरवात झाली. विश्रामबाग गणपती मंदिर, चांदणी चौक, राममंदिर कॉर्नर, पंचमुखी मारूती रोड, फौजदार गल्ली मार्गे शास्त्री चौक येथे रॅली आली. शास्त्री चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गणपतीपेठ मार्गे स्टेशन चौकात रॅलीची सांगता झाली. या रॅलीत ज्येष्ठ नागरिक, युवक, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. 

आमदार गाडगीळ म्हणाले, भाजपची तिरंगा एकता रॅली ही संविधानाच्या सन्मानासाठी तसेच विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची हाक देण्यासाठी आयोजित केली होती.  राष्ट्रीय एकात्मतेतून राष्ट्रीय विकास हे भाजपचे ध्येय आहे. त्यादिशेने केंद्र, राज्य शासन प्रयत्नपूर्वक ठोस पावले टाकत आहे. जनतेचीही उर्त्स्फूत साथ मिळत आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता बनण्याच्या दिशेने गतीने झेप घेत आहे. तिरंगा एकता रॅलीस सर्वत्रच मोठा प्रतिसाद मिळाला आहे.