Tue, Jul 23, 2019 02:34होमपेज › Sangli › सांगलीत भाजपचा आज विजयोत्सव

सांगलीत भाजपचा आज विजयोत्सव

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 08 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने  सत्तांतर घडविले. याचा  विजयोत्सव बुधवारी (दि. 8) सांगलीत मेळाव्याद्वारे करण्यात येणार आहे. कर्नाळ रस्त्यावरील धनंजय गार्डनमध्ये सायंकाळी 5 वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख आदिंसह मान्यवर नेत्यांची उपस्थिती आहे.या मेळाव्याच्या निमित्ताने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, विकासकामांसह आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारीला लागण्यासाठी कार्यकत्यार्ंंना संदेश  देण्यात येणार आहे.

यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, भाजपचे प्रदेश संघटन प्रमुख रघुनाथ कुलकर्णी,रवी अनासपुरे यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत.  पक्षातर्फे माहिती देण्यात आली, की महापालिका निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनीच विजयोत्सव साजरा केला होता. नेतेमंडळींना व पदाधिकार्‍यांना एकत्रित येता आले नव्हते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्तांतर झाले आहे. त्याचा भाजपने जल्लोष साजरा करण्याचा निर्णय घेताल आहे. त्यासाठी हा विजयी मेळावा आयोजित केला आहे. 

मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कमिटी सदस्य, विविध विभागांचे प्रमुख, आघाड्यांचे प्रमुख व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले आहे.