होमपेज › Sangli › ‘सॅलरी’च्या सभेत गोंधळ, आरोप-प्रत्यारोप

‘सॅलरी’च्या सभेत गोंधळ, आरोप-प्रत्यारोप

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:14PMसांगली : वार्ताहर 

सॅलरी अ‍ॅर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सभेत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत गोंधळ घातला. ध्वनीक्षेपक हिसकावणे, व्यासपीठाकडे धाव घेणे, मंजूर-नामंजूरच्या घोषणा यामुळे आजची सभा चांगलीच गाजली. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष झाकीर हुसेन चौगुले होते.

अध्यक्षांनी स्वागत करून सभेला सुरुवात केली. त्यानंतर सचिव वसंत खांबे यांनी  नोटीस वाचन केले. अकौंटंट नंदकुमार लोखंडे यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले. सभेचे विषय वाचन सुरू होताच विरोधी गटाचे बजरंग कदम यांनी मध्येच हस्तक्षेप करत कोअर बँकिंगचा मुद्दा उपस्थित केला. अहवालात नमूद केल्याप्रमाणे कोअर बँकिंगमुळे फ ायदा होत असला तरी कर्जदारांचा पाऊण ते  अर्धा टक्का नुकसान होत असल्याचा आरोप  त्यांनी केला.

यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी गटाचे व्ही. टी. शिंदे यांनी बजरंग कदम यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ध्वनीक्षेपकाचा ताबा  घेत कदम यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कदम यांच्या  मदतीला दिलीप शिंदे व विरोधी गटाचे सदस्य धावले. या गदारोळात सभागृहात जोरात घोषणाबाजी सुरू  झाली.

सलीम मुल्ला यांनी कोअर बँकिंग झाल्याने सर्व कर्जांना एकच व्याजदर असावे. व्याजदरात भिन्नता नको, असे सांगितले. या सूचनेचा संचालक मंडळ विचार करेल, असे आश्‍वासन अध्यक्षांनी दिले. काही कर्जावर सव्वा सोळा टक्के व्याज आकारले जात असल्याचा मुद्दा सुकुमार पाटील यांनी उपस्थित केला. यावर सत्ताधारी व विरोधी समर्थक सभासदांनी गोंधळ सुरू केला. अध्यक्षांनी याबाबत खुलासा करूनदेखील समाधान न झाल्याने सुकुमार पाटील व्यासपीठावर गेले. बंडू जावीर व आकाराम चौगुले यांनी त्यांच्या हाताला धरून व्यासपीठावरून खाली आणले. त्यामुळे विरोधक आणखी संतप्त झाले. 

दिलीप शिंदे यांनी अहवालातील मयत फंडातील आकड्यांच्या त्रुटीबद्दल शंका उपस्थित केली. तसेच वर्षानुवर्षे जी कर्जे थकीत आहेत व ती कर्जे वसूल होऊ शकत नाहीत, अशी कर्जे गंगाजळीतून (राईट ऑफ) भरून घेऊन एनपीए कमी करण्याची सूचना केली. अध्यक्षांनी ही सूचना मान्य करून लवकरच समिती नेमून याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. सभेच्या सुरुवातीला सुभाष थोरात, संजय सडकर आदी पदाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

उपाध्यक्ष विद्यामती रायनाडे, सत्ताधारी गटाचे नेते डी. जी. मुलाणी, जे. के. महाडिक, पी. एन. काळे, प्रकाश पाटील, प्रदीप कदम, राजेंद्र कांबळे, अभिमन्यू मासाळ, लालासाहेब मोरे, सचिव वसंत खांबे आदी संचालक तसेच शशिकांत सुतार, नंदू  ढोबळे, संजय आवटे, कल्पेश लोंढे, नितीन कुलकर्णी, बिरू हेगडे, आदी उपस्थित होते.