Sun, Aug 18, 2019 20:42होमपेज › Sangli › महापुरुषांच्या नावांचा वापर करून समाज बिघडवला

महापुरुषांच्या नावांचा वापर करून समाज बिघडवला

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 26 2018 12:03AMतासगाव : शहर प्रतिनिधी

आजचा महाराष्ट्र जातीपातींनी दुभंगलेला आहे. राजकीय नेते मात्र शुद्धतेचा आव आणत आहेत.  महाराष्ट्रातील सरकार आणि हे राजकारणी   जनतेकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच  शहरातील संमेलने ही नटवीथटवी असतात, पैसे घेऊन पुरस्कारांची संमेलने भरवली जातात. सध्या महापुरूषांच्या नावांचा वापर करून  समाज, धर्म बिघडवला जात आहे,  अशी घणाघाती टीका 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व दुसर्‍या प्रतिष्ठा  राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.

तासगाव येथील लेखणीसम्राट गणपतराव व्ही. माने-चिंचणीकर साहित्यनगरी,  समृद्धी मल्टीपर्पज हॉल येथे  प्रतिष्ठा  फौंडेशनच्यावतीने   दुसर्‍या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन झाले. यावेळी ते बोलत होते. स्वागताध्यक्ष तहसीलदार सुधाकर भोसले, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव, कविसंमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, गटविकास अधिकारी अरुण जाधव, फौंडेशनचे अध्यक्ष तानाजी जाधव उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, आजच्या काळात नवनवीन लेखक जन्माला येत आहेत. मात्र संस्कृतीवर प्रकाश टाकणारे साहित्य घडले पाहिजे. संस्कृती शुद्धीकरण झाले पाहिजे आणि यासाठी साहित्य संमेलने तुरटीसारखे काम करतात. शहरातील संमेलने ही नटवीथटवी असतात, पैसे घेऊन पुरस्कारांची संमेलने भरवली जातात. लोकांच्या अडचणी सोडवल्या तर ते पुन्हा आपल्याकडे येणार नाहीत म्हणून हे राजकारणी आपल्या भागाचाही विकास करत नाहीत, एवढ्या खालच्या थराला नेत्यांची विचारशैली गेली आहे. महापुरूषांच्या नावाने समाज, धर्म बिघडवला जात आहे, साहित्यातून तो बिघडवू देऊ नका, असेही ते म्हणाले.

यावेळी नगरसेवक किशोर गायकवाड,  प्रा. जी.के. पाटील, पी.डी. सागावकर यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.