येळवी : विजय रुपनूर
मिरज -कवठेमहांकाळ -जत -विजापूर आणि पंढरपूर -मंगळवेढा -उमदी -विजापूर या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण झाले आहे, अशी माहिती मिळाली. तो अहवाल रेल्वे मंडळाकडे सादर केला आहे .पंढरपूर-उमदी -विजापूर या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण जत तालुक्यातील गावांतून झाले आहे. उमदी, बालगाव, तिंकोडी तसेच विजापूर भागातून सर्वेक्षण झाले आहे. जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. वाहतूक आणि दळणवळण विकासाला चालना मिळावी याकरिता अनेक वर्षांपासून तालुक्यातून मिरज-पंढरपूर व्यतिरिक्त आणखी एखादा मार्ग जावा, अशी लोकांची मागणी होती. मध्यंतरी याविषयी फारसे कोणीच लक्ष दिले नाही.
सद्यस्थितीत जत तालुक्यातील मिरज-कवठेमंहकाळ -जत-विजापूर आणि पंढरपूर - मंगळवेढा -उमदी -विजापूर या दोन्ही रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याकरिता माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी प्रयत्न केले होते. आता हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याकरिता खासदार संजय पाटील यांनी पाठपुरावा करावा. काम पूर्ण करण्याकरिता पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
विकासाला चालना
तालुक्यातील दोन्ही प्रस्तावित रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. वेळ, आर्थिक बचत, वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील जनतेस रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास जत पासून दूर असलेल्या जतरोड (वाळेखिंडी ) येथे जावे लागते किंवा कवठेमंहकाळ येथील ढालगाव ,अलकूड फाटा याठिकाणी असणार्या रेल्वेस्टेशनवर जावे लागते.याठिकाणी जाण्यास वेळेवर वाहन मिळत नाही. मर्यादित बससेवा असल्यानेे मिरज रेल्वेस्टेशनला जाणे पसंत करतात.
रेल्वे वाहतूक सुविधामुळे उत्पादनात वाढ
जत रोड स्टेशन (JTRD) शहरा पासून दूर अंतरावर असूनसुध्दा नेहमी वाढता आलेख राहिला आहे. शेगाव-बनाळी-वाळेखिंडी परिसरातील गावांना या स्टेशनमुळे भरपूर लाभ या परिसरातील गावांना मिळत आहे.जत रोड रेल्वेस्टेशनला सुरुवातीला दीड ते दोन लाख मिळणारे उत्पन्न या वर्षी सोळा लाखापेक्षा जास्त मिळाले आहे. जतसारख्या दुष्काळी भागातून / तालुक्यातून जाणार्या मिरज-कवठेमहांकाळ - जत-विजापूर आणि पंढरपूर-मंगळवेढा-उमदी-विजापूर या नवीन रेल्वेमार्गासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात मिरज-पंढरपूर-लातूररोड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी तरतूद करुन प्रत्यक्ष काम युध्दपातळीवर सुरू आहे . रेल्वे मार्गाचे लवकरात लवकर काम करण्याची मागणी तालुक्यातील मिरज-कवठेमंहकाळ - जत - विजापूर व पंढरपूर - मंगळवेढा -उमदी -विजापूर या दोन्ही रेल्वे मार्गाचा सर्वे पूर्णत्वास असून हे दोन्ही रेल्वेमार्ग पूर्ण करण्याकरिता खासदार संजय पाटील यांनी पाठपुरावा करुन काम पूर्ण करण्याकरिता पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.