सांगली : प्रतिनिधी
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवतिर्थावर (मुंबई) झालेल्या सभेत त्यांनी भाषणात आक्षेपार्ह मुद्दे मांडले आहेत. चिथावणी देणारे तसेच समाजात तेढ निर्माण करणारे भाषण त्यांनी केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार भाजपतर्फे करण्यात आली. याबाबत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे.
त्यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, रविवारी झालेल्या सभेत ठाकरे म्हणाले की, पुढील काही महिन्यात धार्मिक दंगल घडविली जाणार आहे. या दंगलीचे प्रमुख कारण राम मंदीर असणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिराचा खटला पुढे ढकलला जाणार आहे. अशा प्रकारे ठाकरे यांनी चिथावणी देणारे तसेच तेढ निर्माण करणारे भाषण केले आहे. त्यांना दंगल होणार असल्याचे आधीच माहिती असून त्यांनी ती माहिती पोलिसांपासून लपविल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. हा तक्रार अर्ज पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांना देण्यात आला. यावेळी केळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags : Complaint, against, raj thackeray, sangali police, sangali news, manase, BJP