Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Sangli › स्वीकृत सदस्य निवडीत स्पर्धा; गटबाजी नाही

स्वीकृत सदस्य निवडीत स्पर्धा; गटबाजी नाही

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:08PMसांगली : प्रतिनिधी

भाजपचे तीन स्वीकृत सदस्य होतील. त्यासाठी 22 जण इच्छुक आहेत. स्पर्धा जरूर आहे. परंतु कोणतीही गटबाजी- संघर्ष नाही, असा दावा  माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी पत्रकार बैठकीत केला. 

ते म्हणाले, आमदार-खासदारांसह कोअर कमिटी व नगरसेवकांची आम्ही बैठक घेऊ. त्यावेळी ठरणारी नावे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कळवू. ते कोणाला संधी द्यायची याचा  फैसला करतील. ती नावे सभागृह नेते सोमवारी (10 सप्टेंबर) महासभेत जाहीर करतील.

यावेळी महापौर सौ. संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते युवराज बावडेकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. इनामदार म्हणाले, भाजप महापालिकेत प्रथमच सत्तेत आला आहे. स्थायी आणि अन्य समित्या तसेच  स्वीकृत सदस्य यासाठी  सर्वच नगरसेवक, कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे.  खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गटनेते बावडेकर, महापौर सौ. खोत यांच्याकडे इच्छुकांनी  मागणी केली आहे.

कोअर कमिटीचे नेते माजी आमदार दिनकर पाटील,  दिलीप सूर्यवंशी  यांच्याकडेही त्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांत मोठी स्पर्धा आहे. परंतु त्याचा  फायदा घेत विरोधकांनी भाजपमध्ये नाराजीच्या अफवा पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. परंतु भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नाही. सर्व 42 नगरसेवक एकसंध आहेत.एकसंधच राहतील. ना. पाटील देतील यांचा आदेश अंतिम असेल. ते सर्वांना मान्यही आहे. 

सौ. खोत, बावडेकर म्हणाले, भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे. यामध्ये अन्य पक्षांप्रमाणे गटबाजी नाही. सत्तेसाठी कोणी हपापलेले नाहीत. धीरज सूर्यवंशी म्हणाले, स्वीकृतवरून आम्ही कोणीही नाराज नाही. कोणी अफवा पसरवत असेल तर त्याचाही आम्ही बंदोबस्त करू. नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, पांडुरंग कोरे, राजेंद्र कुंभार, निरंजन आवटी, संदीप आवटी, प्रकाश ढंग, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.

संधी मिळो न मिळो पक्षाबरोबरच

माजी महापौर विवेक कांबळे म्हणाले, मला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळो न मिळो मी पक्षासोबतच राहणार आहे. कोणतीही बंडखोरी करणार नाही. मुन्ना कुरणे म्हणाले, मी सहावेळा नगरसेवक होतो.त्यामुळे मी स्वीकृतसाठी इच्छुक नाही. भाजपकडून शहराच्या आशा आहेत. त्यासाठी आम्ही सक्रिय राहू.