होमपेज › Sangli › स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सामुदायिक प्रयत्न

स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सामुदायिक प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ अंतर्गत शहराचा प्रथम क्रमांक येण्यासाठी  सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय पालिकेच्या विशेष सभेत झाला.  विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे विविध विकासकामांना मंजुरी देण्याचा विषय तहकूब करण्यात आला. तीन विषयासाठी ही सभा तब्बल साडेतीन तास चालली.  

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत  सभा झाली. विषयपत्रिकेवर पहिलाच विषय प्रभाग क्र. 1 ते 14 मधील विविध विकासकामांना मंजुरी देण्याचा होता. या विषयाला राष्ट्रवादीचे नगरसेवक विश्‍वास डांगे यांनी विरोध दर्शविला. 

ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे 17 जूनरोजी विनंती करून विशेष सभा बोलविण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने ही सभा होत आहे. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकार्‍यांना अधिकार प्राप्‍त झाले आहेत. तरीही नगराध्यक्षांनी आपल्या अधिकाराखाली ही सभा बोलावून त्यात विषय क्र. 1 चा समावेश केला आहे. त्यामुळे तो विषय तहकूब करण्यात यावा. 

या विषयावर सभागृहात सुमारे दीड तास चर्चा झाली. विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी सत्तारुढ गटाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र डांगे यांनी उपसूचना दिल्याने शेवटी हा विषय तहकूब करण्यात आला. ‘स्वच्छ सर्वेक्षण मोहीम 2018’ अंतर्गत राज्यात इस्लामपूरचा प्रथम क्रमांक यावा यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांवर सभागृहात सविस्तर चर्चा झाली.

हे अभियान सर्वांनी सामुदायिकपणे यशस्वीपणे पार पाडण्याचे ठरले. पालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या विविध बगीचा व इमारतींचे उद्घाटन करण्याच्या विषयावर चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक खंडेराव जाधव यांनी ही कामे आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे झाली असल्याने त्यांच्याहस्ते उद्घाटन व्हावे, अशी सूचना मांडली.  विक्रम पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन सभागृहापुढे आले पाहिजे, अशी मागणी केली.

उपनगराध्यक्ष दादासो पाटील, शहाजीबापू पाटील, आनंदराव मलगुंडे, आनंदराव पवार, खंडेराव जाधव, अ‍ॅड. चिमण डांगे, डॉ. संग्राम पाटील, सुनीता सपकाळ, जयश्री माळी, प्रदीप लोहार, शकील सय्यद यांनी चर्चेत भाग घेतला.