Mon, Aug 19, 2019 05:57होमपेज › Sangli › साखर उद्योग प्रश्‍नावर तोडग्यासाठी समिती

साखर उद्योग प्रश्‍नावर तोडग्यासाठी समिती

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख या समितीचे अध्यक्ष असून, ही समिती राज्य पातळीवरील उपाययोजनांसाठी तोडगा सुचविणार आहे. तर हे सर्वपक्षीय समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, केंद्र सरकारने या उद्योगाला आर्थिक मदत करावी, यासाठी आग्रही भूमिका मांडणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनतील त्यांच्या दालनात साखर उद्योगाच्या  प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी  या उद्योगासमोरील विविध अडचणी मांडल्या.

यामध्ये साखरेचे जादा झालेले उत्पादन, साखरेची घटलेली मागणी, यामुळे एफआरपी देण्यात निर्माण झालेली अडचण, बँकेकडून कमी झालेले साखरेचे मूल्यांकन, शासनाकडील थकीत देण्यासाठी सुरू असलेला तगादा, साखर निर्यात करण्यातील अडचणी, उद्योगाला जाणवणारा महसुली उत्पन्‍नाचा  तुटवडा या बाबींचा प्रामुख्याने समावेश होता.

यातील प्रामुख्याने ज्या मागण्या साखर उद्योगाकडून करण्यात आल्या, त्यामध्ये निर्यात साखरेसाठी व वाहतुकीसाठी अनुदान देण्यात यावे, साखरेचा बफर स्टॉक करण्यात यावा, यासह अन्य मागण्या या केंद्र सरकारशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. निर्यात अनुदान, साखर उद्योगासाठी अर्थसहाय्य याबाबत उत्तर प्रदेशसारख्या साखर उत्पादक अन्य राज्यातही समस्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन साखर उद्योगाचे मागणे त्यांच्यासमोर मांडले जाईल.

केंद्र सरकारने या उद्योगाला मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतरही राज्य पातळीवर जे काही मदतीचे प्रश्‍न आहेत, त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती तोडगा सुचविणार आहे. राज्याच्या पातळीवर जी मदत करावी लागणार आहे, त्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

या बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आ. हसन मुश्रीफ, राजेश टोपे व चंद्रदीप नरके, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश पाटील-दांडेगावकर व श्रीराम शेटे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, राष्ट्रीय साखर संघाचे प्रतिनिधी प्रकाश नाईकनवरे यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags : Sangli, Sangli News, Committee, settle, sugar industry question