Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Sangli › महापौर, नगरसेवकांकडून दबावतंत्र

महापौर, नगरसेवकांकडून दबावतंत्र

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 18 2018 11:25PMसांगली : प्रतिनिधी

महापौरांसह पदाधिकारी, नगरसेवकांकडून कामांसाठी नियमबाह्य प्रचंड दबावतंत्राचा अवलंब केला जातो. बंगल्यावर पाळत ठेवण्यापासून जाणीवपूर्वक टार्गेट करून बदनामीचे षङ्यंत्र सुरू आहे. प्रसंगी अनियमित कामे मंजुरीसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी केला आहे. यासंदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठविल्याचे त्यांनी सांगितले. अशा अनियमित कामांच्या फाईलींचे गठ्ठे माझ्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. 

खेबुडकर म्हणाले, मला आयुक्त म्हणून रूजू होऊन दोन वर्षे झाली. वास्तविक या शहराशी 25-30 वर्षांहून अधिक काळ मी संबंधित आहे. सांगली माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मी शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. 

या अंतर्गत गेल्या दोन वर्षांत 200 कोटींहून अधिक विकासकामे मार्गी लावल्याची कबुलीही सत्ताधारी-विरोधक सर्वच पक्ष देतात. महापालिका आर्थिक अडचणीतून बाहेर काढली. कर्मचार्‍यांचे रोस्टर, रोड रजिस्टरसह विविध कधीच न झालेली कामे केली. पाणी, ड्रेनेज, घरकुलसह विविध योजना मार्गी लावल्या. उद्याने, रुग्णालये उभारणीसह अनेक कामे मार्गी लावली. आतापर्यंत कधीच झाली नव्हती एवढी कामे मी केली आहेत. 

ते म्हणाले, अर्थात हे करीत असताना बेकायदेशीर कामांना मी ब्रेक लावला. साखळी पद्धतीने टेंडर मॅनेज करणे, अनावश्यक, वाढीव कामांवर उधळपट्टी रोखली. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. अर्थात हे करताना कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा नाईलाज आहे. परंतु यातून नगरसेवक, पदाधिकार्‍यांच्या प्रतिमा उंचावण्याचेच काम मी केले आहे. यात गैर काय?

खेबुडकर म्हणाले, पण यामुळे काहीजणांच्या इगोला ठेच पोहोचली. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांनी माझ्यावर आरोप करणे, प्रसंगी कार्यालयात येऊन फाईली मंजुरीसाठी दबाव टाकण्याचे प्रकार केले व अजूनही सुरू आहेत. कामे विनाविलंब व्हावीत यासाठी मी बंगल्यावर बसून महापालिकेचीच कामे करीत होतो. तर तेथे माझ्यावर पाळत ठेवण्याचे कूट कारस्थान केले. तेथे येऊनही काहीजणांनी दंगा केला. 

माझ्याकडे कोणी आले तर त्याच्याबद्दल अफवा पसरविण्याचे प्रकार केले. एवढेच नव्हे तर महापालिकेत महासभा, स्थायी समिती सभांमध्येही अधिकार्‍यांना टार्गेट करून अवमानास्पद वागणूक दिली जात आहे. आंदोलने, निदर्शने, तक्रारींपासून विविध प्रकारही करून पाहिले. राज्यातील नेत्यांकडेही खोट्या तक्रारी करून बदनामी सुरू आहे. 
यामुळे माझ्यासह अनेक अधिकार्‍यांना अक्षरश: असह्य अशा तणावाखालीच काम करावे लागत आहे. ज्या चुकीच्या कामांसाठी हा प्रकार केला जात आहे त्याचे पुरावेही मी शासनाला दिले आहेत. याबाबत योग्य ते निर्णय आणि उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी नगरविकास मंत्रालयाकडे केली आहे.

आयुक्त-सत्ताधारी संघर्ष वाढणार

खेबुडकर यांनी महापालिकेतील गैरकारभार आणि दबावतंत्राबद्दल शासनाकडे तक्रार केली. यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयुक्त-सत्ताधारी संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.