Wed, Jul 17, 2019 20:44होमपेज › Sangli › आयुक्‍त भाजपधार्जिणे; ते निवडणूक अधिकारी नकोत

आयुक्‍त भाजपधार्जिणे; ते निवडणूक अधिकारी नकोत

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 11:52PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका आयुक्‍त रवींद्र खेबुडकर हे भाजपधार्जिणे आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्यांच्या अधिपत्याखाली निवडणूक झाल्यास पक्षपातीपणा होण्याचा धोका आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक अधिकारीपदावरून हटवावे, अशी मागणी महापौर हारूण शिकलगार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेत काँगे्रसची सत्ता आहे. गेल्या दोन वर्षांपासून खेबुडकर हे पक्षपातीपणे काम करीत आहेत. जाणीवपूर्वक कामे अडवून जनतेत सत्ताधार्‍यांची बदनामी करीत आहेत. त्यांच्यामुळे कामे ठप्प झाली असून, जनतेच्या  रोषाला आम्हाला समोर जावे लागते आहे. 

आता तर आयुक्तांनी निवडणूक आयोगाचा सन 1969 चा आदेश दाखवून निवडणुकीपूर्वीच तीन महिने आधी  विकासकामे प्रलंबित ठेवण्याचे आदेश मनपाच्या खातेप्रमुखांना दिले आहेत. एकीकडे महापालिकेला हा नियम लावताना दुसरीकडे हे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला लागू नाहीत. त्यामुळे मनपा क्षेत्रात नगरसेवकांची कामे आयुक्‍तांच्या आदेशाने ठप्प झाली आहेत. मात्र दुसरीकडे मंत्री, राज्यमंत्री, आमदार व खासदारांना काम करण्यास मुभा मिळत आहे. हा खेबुडकर यांचा उघड पक्षपातीपणा आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्हाभर लागू होती. त्यानुसार मनपाच्या पदाधिकार्‍यांची वाहने व सीमकार्ड प्रशासनाने काढून घेतली. कार्यालयातील फलक देखील काढले. निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा झाली तरी देखील पदाधिकार्‍यांना अद्याप वाहने दिली नाहीत.महापौरांनी निवेदनात म्हटले आहे, की राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सोमवारी सांगलीत येणार होते.  त्यामुळे आयुक्तांनी पदाधिकार्‍यांना घाईगडबडीने रविवारी रात्री वाहने दिली व कार्यालयाचे फलक लावले. त्यांनी अधिकार्‍यांना व्हाट्सअ्पवरून पाठविलेले संदेश तपासून  त्याची सत्यता पडताळून पहावी.  आयुक्तांनी अनेक कामे अधिकाराचा गैरवापर करून केली आहेत. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. 

ईव्हीएमचा धोका नको; मतपत्रिकाच वापरा

महापौर शिकलगार म्हणाले, ईव्हीएम मशिनबाबत सर्व स्तरांवर शंका व्यक्‍त होत आहेत. भाजपचा तर यात हातखंडा असून, जनाधार नसल्याने सांगलीत त्यांच्याकडून ईव्हीएमचा दुरूपयोग होऊन एकतर्फी निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वादाला फाटा देऊन थेट मतपत्रिकाच वापराव्यात. त्यामुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ समोर येईल.