Fri, Jul 19, 2019 17:46होमपेज › Sangli › संघर्ष नको; समन्वयाची भूमिका ठेवा

संघर्ष नको; समन्वयाची भूमिका ठेवा

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 10:33PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

महापालिका स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे आयुक्‍तांनी महसुली हुकूमशाही थांबवावी. संघर्ष नको; समन्वयाची भूमिका ठेवावी. त्यामुळे तीनही शहराच्या विकासासाठी मीही दोन पावले पुढे यायला तयार आहे, असे आवाहन महापौर हारुण शिकलगार यांनी पत्रकार बैठकीत केले. नगरसेवकांचा अट्टाहास जनतेच्या विकासकामांसाठी आहे. आयुक्‍तांनी मतभेद विसरून ती कामे मार्गी लावावीत, असेही ते म्हणाले. 

आतापर्यंत 188 कोटी रुपयांची कामे मंजुरीचा आयुक्‍तांचा दावा खोटा आहे, हे त्यांनी आकडेवारीसह सादर केले. एकूण 188 कोटी रुपयांच्या विकासकामांपैकी केवळ 80 कोटी रुपयांच्या कामांच्या वर्कऑर्डर दिल्या आहेत. वास्तविक साडेचारशे कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांची तुलना केली तर हे केवळ 18 टक्के होते. मग आयुक्‍तांनी किती विकासकामे केली तेही स्पष्ट होते.

शिकलगार म्हणाले, माझे आयुक्तांशी काही व्यक्‍तिगत भांडण नाही.  महापालिका निवडणूक जवळ आली आहे. प्रत्येक सदस्याला आपल्या प्रभागात विकास काम व्हावे अशी धडपड असते. असे असताना आयुक्त कामे अडवून सदस्यांना अडचणीत आणत आहेत. विकास कामासाठी 2016-17 साठी अंदाजपत्रकात 199 कोटी 51 लाख रुपयांची, तर 2017-18 मध्ये 245कोटी 72 लाख रुपयांची विकासकामे अंदाजित होती. असे असताना 188 कोटींच्या कामांचा दावा करणार्‍या खेबुडकर यांनी 9 जून 2016 रोजी पदभार घेतल्यापासून आजअखेर 134 कोटी रुपयांच्याच विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रत्यक्षात वर्कऑर्डर केवळ 80 कोटी 10 लाख 12 हजार 416 रुपये इतक्याच कामांना दिली आहे. पण त्यापैकीही केवळ 34 कोटी रुपयांचीच कामे झाली. त्यांनाही तत्कालीन आयुक्‍त अजिज कारचे यांनी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यामुळे हे प्रमाण 18 टक्के होते. श्री. कारचे यांनी 7.20 कोटी रुपयांची दोन वर्षांपूर्वी रस्त्यांची कामे मंजूर केली. ती आजतागायत झाली नाहीत. मग आयुक्‍तांनी कसला विकास साधला?  ते किती कार्यक्षम आहेत हे जनता ठरवेल.ते म्हणाले,  कामे अडवून जनतेचे आणि आमचे नुकसान न करता समन्वयाची भूमिका ठेवावी.