Sun, Mar 24, 2019 17:04होमपेज › Sangli › आयुक्‍त-राष्ट्रवादी वादावर अखेर पडदा

आयुक्‍त-राष्ट्रवादी वादावर अखेर पडदा

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 11:57PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

विकासकामे रोखल्याचा आरोप करीत आयुक्‍तांविरोधात राष्ट्रवादीचे महापालिकेत सत्याग्रह आंदोलन सुरू होते. त्या वादावर अखेर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्या मध्यस्थीने पडदा पडला. त्यांनी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकार्‍यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढला. 
आयुक्‍तांनी 10 दिवसांत सर्व कामांच्या वर्क ऑर्डर  देण्याची हमी दिली. खेबुडकर यांनी ही सर्व कमिटमेंट लेखी देण्याचे ठरले. त्यानुसार राष्ट्रवादीने पाच दिवस सुरू असलेले आंदोलन मागे घेतले.

मोहिते म्हणाले,जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी  यापूर्वी आयुक्‍त म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना आमच्या अडचणी लक्षात आल्या.  खेबुडकर यांनीही आर्थिक अडचणींसह विविध कारणे मांडली. त्यातून तोडगा काढण्यासाठी  जिल्हाधिकार्‍यांनी काही सूचना केल्या.

मोहिते म्हणाले, यामध्ये आयुक्‍तांच्या सहीने मंजूर  975 कामांपैकी 115 कोटींच्या 660 कामांच्या वर्कऑर्डर दिल्या आहेत. उर्वरित 315 कामांच्या वर्कऑर्डर आठ दिवसांत त्रुटी दूर करून वर्कऑर्डर देऊ, असे खेबुडकर यांनी आश्‍वासन दिले. सदस्यांच्या बायनेम तसेच प्रभाग विकास निधीतून 25 लाखांची कामेही 8 दिवसांत मंजूर करण्याचे आश्‍वासन दिले. 

ज्या कामांना शून्य प्रतिसाद आहे त्यांच्या तत्काळ फेरनिविदा काढल्या जातील. ज्यांच्या दोन निविदा आल्या आहेत त्यांच्या वर्कऑर्डर तत्काळ देण्यात येणार आहेत. कुपवाडच्या ड्रेनेज योजनेसाठी एचटीपी प्रकल्पाला आयुक्‍त  5 एकर जागा  तात्काळ  खरेदी करतील. त्यानुसार पुढील महासभेतच ड्रेनेज योजनेचा प्रश्‍न मार्गी लागेल.

युवराज गायकवाड म्हणाले, हॉटमिक्स ठेकेदारांनी संप केल्याने कामे ठप्प आहेत. त्यांचा दीड कोटी रुपये बिलांचा प्रश्‍न चार-पाच दिवसांत मार्गी लावण्याचे खेबुडकर यांनी आश्‍वासन दिले.  स्फूर्ती चौक-एमएसईबी रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार आहे. त्याला विलंब लागणार असल्याने सध्या महापालिकेमार्फत 15 दिवसांत पॅचवर्क करून खड्डेमुक्‍त रस्ता करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

ही कामे गतीने पार पाडण्यासाठी नऊ  पदवीधर अभियंते मंगळवारी निविदा काढून भरण्यात येतील. विस्तारित भागात रिक्षा घंटागाड्या घेण्यात येणर आहेत. त्यापैकी 9 गाड्यांची दरमान्यता झाली आहे. त्या लगेचच घेण्यात येतील. उर्वरित 21 रिक्षागाड्यांचे टेंडर काढून प्रश्‍न मार्गी लागेल. 

विष्णु मानेंची नोटीस मागे घेणार

नगरसेवक विष्णु माने यांना आयुक्‍तांनी दिलेली फौजदारी नोटीसही चार दिवसांत मागे घेण्याची हमी दिली.  शहर अभियंता  बामणे, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, नगरसेवक विष्णु माने, दिग्विजय सूर्यवंशी, राजू गवळी, सौ. संगीता हारगे, अंजना कुंडले, कांचन भंडारे, प्रार्थना मदभावीकर, स्नेहा औंधकर, आशा शिंदे, प्रियांका बंडगर, माधुरी कलगुटगी, अल्लू काझी, जुबेर चौधरी, हरिदास पाटील, सागर घोडके, अभिजित हारगे, रोहन भंडारे आदी उपस्थित होते.