होमपेज › Sangli › आरक्षणावरून काँगे्रस-राष्ट्रवादी राजकीय पोळी भाजताहेत : सदाभाऊ खोत 

आरक्षणावरून काँगे्रस-राष्ट्रवादी राजकीय पोळी भाजताहेत : सदाभाऊ खोत 

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:39PMइस्लामपूर : वार्ताहर

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत भाजपला मिळालेले यश कौतुकास्पद आहे. या निकालावरून देवेंद्र फडणवीस हे  प्रामाणिक मुख्यमंत्री आहेत, हेच मतदारांनी दाखवून दिले आहे, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँगे्रस-राष्ट्रवादी आपली राजकीय पोळी भाजून  घेत आहेत, असा आरोपही त्यांनी पत्रकार बैठकीत केला. 

ना. खोत म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी  शेतकर्‍यांना न्याय देण्याबरोबरच शिक्षण सम्राटांची मक्तेदारीही मोडून काढली. त्यामुळेच आजही राज्यातील जनतेचा त्यांच्यावर विश्‍वास आहे हेच सांगलीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. मात्र ज्यांची दुकानदारी बंद झाली असे चारा छावणी व टँकर माफियांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. 

लवकरच मराठा आरक्षण

खोत म्हणाले, मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही मुख्यमंत्र्यांच्यासह सर्वांचीच भूमिका आहे. मात्र या प्रश्‍नावरून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काँगे्रस-राष्ट्रवादी पक्ष करीत आहे. त्यांना खरेच आरक्षण द्यायचे होते तर त्यांनी अध्यादेश काढून आरक्षण न देता विधानसभेत विधेयक मांडून आरक्षण द्यायला हवे होते. अध्यादेश काढून दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे त्यांना माहित होते. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला. आजपर्यंत काही मराठा घराण्यांच्याच हातात सत्तेची सुत्रे होती. त्यांनी त्यावेळीच हा प्रश्‍न का मार्गी लावला नाही?

आमच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी विधेयक आणले. मागासवर्गीय आयोग स्थापन केला. या आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्याला सभागृहात मान्यता घेवून, आरक्षणाबाबत शिवकालापासून भक्कम पुरावे गोळा करून आम्ही आरक्षण देवू. जेेणेकरून ते न्यायालयात टिकेल. या सर्व प्रक्रियेत हिंसक मार्ग न पत्करता आत्महत्या न करता सर्व आंदोलकांनीही सहभागी व्हावेे. 

निवडणूक लढविण्याचा विचार नाही 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार काय? या प्रश्‍नावर बोलताना ना. खोत म्हणाले, या मतदारसंघाने नेहमीच चळवळीतील कार्यकर्त्यांनाच मतदान केले आहे. चळवळीतूनच मला मंत्रीपद मिळाले. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेचा कार्यकर्ता म्हणून विकासासाठी निधी मंजूर करणे माझे कर्तव्य आहे. निवडणूक लढविण्याचा अद्याप तरी विचार नाही.